टॉनी डीजोरजीच्या तुफानी शतकामुळे टीम इंडियाचा पराभव.! ; मालिकेत १ – १ बरोबरी.

25

गाकबेर्हा : दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेकडून 8 विकेट्सनी दारूण पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. हा सामना मंगळवारी (19 डिसेंबर) सेंट जॉर्ज पार्क, गाकबेर्हा येथे खेळवण्यात आला. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने 8 गडी राखून विजय मिळवला होता.

सध्या टीम इंडिया आणि आफ्रिका यांच्यातील ही सीरिज 1-1 अशी बरोबरीत आहे. आता तिसरा आणि निर्णायक सामना 21 डिसेंबरला पार्लमध्ये खेळवला जाईल. सीरिज जिंकण्यासाठी केएल राहुलच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघाला शेवटचा सामना कोणत्याही किंमतीत जिंकावा लागेल.

जोरजीचं झंझावाती शतक, टीम इंडियाकडून हिसकावला विजय 

दक्षिण आफ्रिका आणि टीम इंडिया यांच्यातील सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करामनं नाणेफेक जिंकून सर्वात आधी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर भारतीय क्रिकेट संघानं त्यांना 212 धावांचं लक्ष्य दिलं. प्रत्युत्तरात आफ्रिकन संघानं 2 गडी गमावून अवघ्या 42.3 षटकांत सामना जिंकला.

आफ्रिकन डावांत टोनी डी जोर्जीनं 122 चेंडूत 119 धावांची नाबाद शतकी खेळी केली. या खेळीत टोनीनं 6 षटकार आणि 9 चौकार लगावले. हे त्याचं वनडे कारकिर्दीतील पहिलं शतक होतं. याशिवाय रीझा हेंड्रिक्सनं 81 चेंडूत 52 धावा केल्या. भारतीय गोलंदाजांपैकी कोणीही आफ्रिकन फलंदाजांवर दबाव टाकू शकला नाही. केवळ अर्शदीप सिंह आणि रिंकू सिंहला प्रत्येकी 1 बळी घेता आला.

तत्पूर्वी, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या सामन्यात भारताचा डाव 211 धावात संपुष्टात आला. साई सुदर्शनने सलग दुसरे अर्धशतक ठोकत 62 धावा केल्या तर कर्णधार केएल राहुलने 56 धावांचे योगदान दिलं. दक्षिण आफ्रिकेकडून नांद्रे बर्जरने तीन विकेट्स घेतल्या तर बेउरन हेंड्रिक्स आणि केशव महाराज यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेत त्याला चांगली साथ दिली.