शिकारीच्या नादात फासकीत अडकला बिबट्या…!

आचरा : आचरा पारवाडी येथे मध्यरात्री वनविभाग कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्नाने केली सुखरूप सुटका आचरा पारवाडी येथे रानटी जनावरांसाठी लावलेल्या फासळीत अडकलेल्या मादी जातीच्या बिबट्याला मध्यरात्री अथक प्रयत्नाने वनविभागाकडून सुखरूप सुटका करत पिंजरयात पकडण्यात आले.

आचरा पारवाडी येथील त्रैवार्षिक हरिनाम सप्ताहाच्या पुर्व तयारी साठी ब्राम्हण देव मंदिर येथे रात्रौ जमलेल्या ग्रामस्थांना रस्त्याकडेला असलेल्या कुंपनात फासकीत बिबट्या अडकल्याचे लक्षात आले. याबाबत ग्रामस्थ रुपेश साटम, श्रीपाद वायंगणकर यांनी पत्रकार अर्जुन बापर्डेकर यांच्या मार्फत वनविभाग अधिकाऱ्यांना याबाबतची कल्पना दिल्यावर सहाय्यक वनसंरक्षक तथा वन्यजीव संरक्षकक्षक अमृत शिंदे आणि त्यांचे सहकारी वनक्षेत्रपाल मदन शिरसागर वनपाल श्रीकृष्ण परीट, कुळेकर, सावळा कांबळे, शरद कांबळे, अनिल परब, राहूल मयेकर, सुरेश अबदारे यांनी तातडीनेघटनास्थळी धाव घेत बिबट्याला सुटकेसाठी प्रयत्न सुरु केले. घटनास्थळी ग्रामस्थांची गर्दीही उसळली होती.

जाळ्याचा वापर करुन फासकीत अडकलेल्या मादी जातीच्या बिबट्याला जाळ्यात जखडून फासकी तोडत पिंजरयात बंद केले. रात्री साडेनऊ च्या सुमारास अडकलेल्या बिबट्याची मध्यरात्री एक नंतर सुटका करण्यात वनविभागाला यश आले होते. सदर बिबट्या साधारण दिड वर्ष वयाचा असल्याचे वनविभागाकडून स्पष्ट करण्यात आले. याबाबत बिबट्याला पिंजरयात बंद करून कुडाळ येथील पशुवैद्यकीय डाक्टर ठाकूर यांच्याकडून तपासणी करून घेत वनविभागाच्या निगराणी खाली ठेवण्यात आले. असल्याचे वनविभागाचे श्रीकृष्ण परीट यांच्याकडून सांगण्यात आले.