नवी मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघ आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघ यांच्यातील एकमेव कसोटीच्या दुसऱ्या दिवशीही भारतीय संघाने आपले निर्विवाद वर्चस्व कायम राखले. इंग्लंड सारख्या तगड्या संघाला पहिल्या डावात 136 धावात गुंडाळले. भारताने पहिल्या डावात 292 धावांची दमदार आघाडी घेतली.
विशेष म्हणजे पहिल्या डावात 428 धावा करूनही इंग्लंडला फॉलो ऑन दिला नाही. भारताकडून दिप्ती शर्माने 5 विकेट्स घेतल्या. तिने फक्त 5.3 षटके टाकली त्यातील 4 षटके निर्धाव होती. दिप्तीने 7 धावा देत 5 विकेट्स पटकावल्या.
भारताने पहिल्या दिवशी 7 बाद 410 धावा केल्या होत्या. दुसऱ्या दिवशी भारताचे पहिला डाव 428 धावात संपुष्टात आला. त्यानंतर इंग्लंडने आपला पहिला डाव सुरू करत 3 बाद 79 धावांपर्यंत मजल मारली. इंग्लंडची टॉप ऑर्डर ठराविक अंतराने बाद होत असताना नॅट सिव्हर ब्रंटने डाव सावरण्याचा प्रयत्न केला.
तिने अर्धशतकी खेळी तर इंग्लंडला शतकी मजल मारून दिली होती. मात्र त्यानंतर दिप्ती शर्माने भेदक मारा करत एका पाठोपाठ एक इंग्लंडच्या पाच फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. इंग्लंडची अवस्था 4 बाद 108 धावांवरून सर्वबाद 136 धावा अशी झाली. इंग्लंडकडून नॅट सिव्हर ब्रंटने सर्वाधिक 59 धावा केल्या.
भारताने पहिल्या डावात 292 धावांची दमदार आघाडी घेतल्यानंतर आपला दुसरा डाव सुरू केला. भारताने बिनबाद 61 धावा केल्यानंतर भारताला तीन धक्के बसले. स्मृती मानधना 26, शेफाली वर्मा 33 आणि यस्तिका भाटिया 9 धावा करून बाद झाली. भारताने आतापर्यंत 42 षटकात 6 बाद 186 धावा केल्या आहेत.
सध्या क्रीजवर कर्णधार हमनप्रीत कौर 44 तर पूजा वस्त्रकार 17 धावा करून नाबाद आहेत. भारताची आघाडी 478 धावांपर्यंत पोहचली आहे.




