जत्रोत्सवात १४५ जादा बसेस धावणार ; विभागीय वाहतूक अधिकारी देशमुख…
कुडाळ : आंगणेवाडी यात्रोत्सवासाठी एस.टी. प्रशासनाने सज्जता ठेवली आहे. जिल्ह्यातील विविध आगारांमधून तसेच प्रमुख रेल्वे स्थानकांमधूनही थेट आंगणेवाडीला एस.टी. बसेस सोडल्या जाणार आहेत. महामंडळाने आंगणेवाडी यात्रोत्सवासाठी १४५ बसेसची व्यवस्था ठेवली असल्याची माहिती एस.टी.चे विभागीय वाहतूक अधिकारी पी.एस. देशमुख यांनी आज दिली.
देशमुख म्हणाले, ४ फेब्रुवारीला आंगणेवाडीची जत्रा आहे. मात्र ३ ते ५ फेब्रुवारी पर्यंत एस.टी. बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. एस.टी. सिंधुदुर्ग विभागाच्यावतीने ३ फेब्रुवारीला रात्री दहा वाजल्यापासून आंगणेवाडीसाठी बस सेवा सुरू होणार आहे. तसेच कणकवली आणि कुडाळ रेल्वे स्थानकातूनही प्रवासी उपलब्धतेप्रमाणे थेट आंगणेवाडीसाठी एस.टी. बसेस सुटणार आहेत.
कुडाळ बस आगारातून हिवाळेमार्गे, खोटले मार्गे तसेच निरूखे, पांग्रड, पणदूर, ओरोस या मार्गावरूनही आंगणेवाडीसाठी बसेस सुटणार आहेत. मालवण बसस्थानक तसेच टोपीवाला हायस्कूल, देवबाग, तारकर्ली येथूनही एस.टी. बसेस सुटणार आहेत. कणकवली, देवगड, वेंगुर्ले या बसस्थानकांतूनही एस.टी. बसेस आंगणेवाडी जत्रेसाठी रवाना होतील असे श्री.देशमुख म्हणाले.
दरम्यान भाविकांसाठी ग्रुप बुकिंग देखील सुरू करण्यात आले आहे. प्रवाशांच्या गावापासून थेट आंगणेवाडीपर्यंत एस.टी. सेवा दिली जाणार असल्याची माहिती देशमुख यांनी दिली





