ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेते अनंत माधव यांचा ८५ व्या वाढदिवसानिमित्त सन्मान.! ; सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या मासिक बैठकीमध्ये स्नेहसत्कार.

62

सावंतवाडी : सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या वतीने ज्येष्ठ नागरिक तथा वृत्तपत्र विक्रेते अनंत माधव यांचा ८५ वा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. यावेळी अनंत माधव यांचा वाढदिवस दरवर्षी होऊ दे आणि आमच्या सोबत त्यांचा वाढदिवस साजरा होवो तसेच त्यांना उत्तम आरोग्य दीर्घायुष्य लाभो, अशा शुभेच्छा देण्यात आल्या. ते आहेत म्हणून आम्ही आहोत. वृत्तपत्र विक्री त्यांनी केली तर आमचे वृत्तपत्र चालणार, त्यामुळे त्यांना दीर्घायुष्य लाभो.!, अशा शुभेच्छा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार यांनी दिल्या. यावेळी केक कापून व केक भरवून त्यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार राजू तावडे यांनी भूतकाळातील पत्रकारिता आणि त्यांनी त्या वेळच्या वृत्तपत्र विक्री करणाऱ्या अनंत माधव यांच्या आठवणी सांगितल्या. अनंत माधव हे ग्रेट सावंतवाडी संस्थान कालापासून वृत्तपत्र विक्री करत असून स्वतः सायकलवरून फिरून ते घरोघरी वर्तमानपत्र पोहोचवत असत. त्यांनी ज्याप्रमाणे आपले आरोग्य पहाटे उठून मेहनतीने व प्रामाणिकपणे काम करून सुदृढ ठेवले तसेच त्यांनी पायी चालत जावून जो सकाळी चालण्याचा आदर्श दिनचर्या ठेवली आहे त्याचा सर्वांनी अंगीकार करावा, म्हणजे आरोग्य सुदृढ राहील आणि त्यांच्यासारखे आपण नेहमी टवटवीत दिसू, अशा प्रकारचे आवाहनही राजू तावडे यांनी केले. यावेळी सचिव मयूर चराटकर, सहसचिव विनायक गांवस, उपाध्यक्ष दीपक गावकर, विजय राऊत, मोहन जाधव, नरेंद्र देशपांडे, श्री.  धारणकर, लुमा जाधव, सुरेश सावंत आदी पत्रकार आणि मित्रमंडळी उपस्थित होते.