बापरे.! कामेच केली नाहीत तरीही २० लाखांचा मलिदा खाल्ला, सावंतवाडी तालुक्यातील ‘ह्या’ ग्रामपंचायतीचा प्रताप.! ; मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार दाखल.

1067

सावंतवाडी : तालुक्यातील तळवडे ग्रामपंचायतमध्ये तब्बल 20 लाख रुपयांचा अपहार झाला असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते नारायण ऊर्फ बाळा दत्ताराम जाधव व शंकर सहदेव सावंत यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे.
सदरच्या तक्रारी निवेदनात तळवडे ग्रामपंचायतमध्ये पंधरा वित्त आयोगातून मिळालेल्या निधीतून तळवडे जाधववाडी विहिरीस लोखंडी रिंग बसवणे हे काम झालेले नसून सदर कामाची रक्कम परस्पर बँक खात्यातून गहाळ केली आहे. तसेच तळवडे येथील काळोबा मंदिर जवळ घाट पायऱ्या बांधणे, सदर काम झालेले नसून परस्पर रक्कम खात्यातून गहाळ करण्यात आली आहे. तसेच तळवडे ग्रा.प. हद्‌दीतील विसर्जन घाट पायऱ्या बांधणे हे सु‌द्धा काम झालेले नसून बँक खात्यातील रक्कम गहाळ केली आहे. अशी मिळून सुमारे वीस लाख रुपयांचा अपहार तळवडे ग्रामपंचायतमध्ये झाला असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच तळवडे ग्रामपंचायतमध्ये अनेक कामे ज्यांचे मूल्यांकन सु‌द्धा झालेले नसून बँकेच्या खात्यातून अनेक रकमा काढलेल्याचा संशय असून अशा सर्व भ्रष्टाचाराची आपल्या स्तरावरती कसून चौकशी करून दोषीवरती कायदेशीर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल व्हावे. तसेच सदर चौकशी होत असताना तक्रारदार म्हणून आम्हाला कळवण्यात यावे जेणेकरून चौकशी कामी आम्हाला पुरावे सादर करता येतील व लेखी जबाब नोंदवता येईल सदर चौकशी होऊन योग्य प्रकारे दोषीवर कारवाई व्हावी, अशी मागणी जाधव व सावंत यांनी निवेदनातून केली आहे