नागपूर : नवाब मलिक हा विषय हिवाळी अधिवेशनात चांगलाच गाजतो आहे. नवाब मलिक हे गुरुवारी सत्ताधारी बाकांवर बसले होते. देशद्रोहाच्या आरोपाखाली ते तुरुंगात होते. ते महायुती सरकारमध्ये गेल्यानंतर महायुती सरकारवर प्रचंड टीका सुरु झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात नवाब मलिक आपल्यासह नकोत हे पत्रही लिहिलं. त्यावर अजित पवार यांनीही पत्राचं काय करायचं मी पाहतो असं म्हटलं आहे. आता या सगळ्यात अजित पवारांची भूमिका महत्त्वाची आहे असं बच्चू कडू म्हणाले आहेत. तसंच एक महत्त्वाची प्रतिक्रियाही त्यांनी दिली आहे.
काय म्हणाले बच्चू कडू.?
अजित पवार आणि नवाब मलिक यांच्या भूमिका महत्त्वाच्या आहेत. नवाब मलिक उद्या म्हणाले की मला अजित पवारांसह जायचं आहे आणि अजित पवार जर म्हणाले की नाही घेत त्यांना तर खरा पिक्चर सुरु होईल. त्या त्या पक्षाची धोरणं सांभाळायचा आहे. नवाब मलिकचा विषय फडणवीस यांच्या दृष्टीने जास्त महत्त्वाचा आहे. मी त्यांच्या मनातलं कसं काय सांगणार? असंही बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.





