सोलापूर : येथील प्राथमिक शिक्षण विभागाचे तत्कालीन शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्यासह पत्नी व मुलाविरूद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८मधील कलम १३ (१) (ई), १३ (२) सहकलम भारतीय दंड संहिता कलम १०९ तसेच सुधारित भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम २०१८ चे कलम १३(१) (ब), १३(२) सहकलम १२ प्रमाणे बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. लाचलुपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. सोलापूर प्राथमिक शिक्षण विभागाचे तत्कालीन शिक्षणाधिकारी किरण अनंत लोहार, त्यांची पत्नी सुजाता किरण लोहार व मुलगा निखिल किरण लोहार यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्याकडे उत्पन्नापेक्षा १११.९३ टक्के अपसंपदा आढळली आहे. दरम्यान, लोहार यांनी परिक्षण कालावधीमध्ये भ्रष्ट व गैरमार्गाने कायदेशीर आणि ज्ञात उत्पन्नापेक्षा अधिक पाच कोटी ८५ लाख ८५ हजार ६२३ रुपयांची अपसंपदा जमविली आहे. त्यांची पत्नी सुजाता लोहार व मुलगा निखिल लोहार यांनी किरण लोहार यांना भ्रष्ट मार्गाने अपसंपदा संपादित करण्यास अपप्रेरणा व सहाय्य केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे.
त्यामुळे त्यांच्या विरोधात देखील गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक उमाकांत महाडिक यांच्याकडे या प्रकरणाचा तपास आहे. उपअधीक्षक गणेश कुंभार यांच्या नेतृत्वाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली आहे. तत्पूर्वी, शालार्थ आयडी प्रस्तावासंदर्भात दाखल प्रस्ताव मंजूर करण्यासाठी लोहारांनी तक्रारदाराकडून लाच घेतली होती. त्यावेळी त्यांना कार्यालयातच रंगेहाथ पकडले होते.
नागरिकांना आवाहन –
दरम्यान, कोणी शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी कोणतेही शासकीय काम करण्यास फी व्यतिरिक्त लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे





