रूपेश पाटील.
सावंतवाडी : आपल्या सर्व परिवाराचा आधारवड हरपला आहे, याची मला जाणीव आहे. मात्र आपण कोणीही घाबरू नका, मी शिक्षक आमदार म्हणून आपल्या कुटुंबासोबत आहे. आपणास आवश्यक ती मदत केली जाईल, फक्त आपण खचून जाऊ नका, असा मोलाचा भावनिक आधार कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी नुकतेच निधन झालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षक बांधवांच्या कुटुंबीयांना दिलाय.
रविवार दिनांक ३ डिसेंबर रोजी कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे हे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असताना सिंधुदुर्ग जिल्हातील अनेक शिक्षक व शिक्षकेतर बांधवांचे प्रश्न समजून घेण्यासाठी न्यू इंग्लिश स्कूल कसाल ता. कुडाळ येथे उपस्थित राहून अनेक शिक्षक व शिक्षकेतर बांधवांचे प्रश्न समजून घेतले आणि तात्काळ कोल्हापूर विभागाचे शिक्षण उपसंचालक महेश चौथे, सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी सुभाष चौगुले, लेखाधिकारी श्री. छडीदार यांच्याशी फोनवर संपर्क करून तात्काळ सर्व प्रश्न मार्गी लावले व जे प्रलंबीत प्रश्न आहेत ते लवकरात लवकर सोडविण्याच्या सूचना केल्या.

त्यानंतर शिक्षक बंधू श्री. कमलेश गोसावी यांच्या वडिलांचे दुखःद निधन झाले होते. त्यांच्या घरी जावून आ. म्हात्रे यांनी सांत्वनपर भेट दिली. या दौऱ्यादरम्यान जिल्ह्यातील शिक्षक बांधवांच्या बाबतीत घडलेल्या दु:खद घटना समजताच तात्काळ शिक्षकांप्रती असलेल्या भावनापोटी करंजे हायस्कूलचे शिक्षक दिवंगत अशोक कांबळे यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांच्याही घरी आ. म्हात्रे यांनी भेट घेऊन कुटुंबियांचे सांत्वन केले.
तसेच बिडवाडी हायस्कूलचे शिक्षक दिवंगत श्रीकांत शेटे सर यांचे देखील अचानक निधन झाले. त्यांच्या घरी देखील सांत्वन पर भेट देऊन त्यांच्या विधवा पत्नीला व लहान मुलांना धीर दिला. आपण कोणीही घाबरू नका, मी शिक्षक आमदार म्हणून आपल्या कुटुंबासोबत आहे. आपणास आवश्यक ती मदत केली जाईल, फक्त आपण खचून जाऊ नका, असा मोलाचा सल्ला त्यांनी यावेळी दिला.
या दोऱ्यावेळी त्यांच्यासोबत सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघ अध्यक्ष वामन तर्फे, सचिव गुरुदास कुसगांवकर, मुख्याध्यापक संघ कणकवली तालुका अध्यक्ष रवींद्र सावंत, सचिव शरद चोडणकर, कास्टाईबचे आकाश तांबे, सुभाष खरात, श्री. तवटे आदींसह शिक्षक बांधव उपस्थित होते.





