राज्यस्तरीय महिला भजन स्पर्धेत गौरी पारकरचा ठसा…!

सावंतवाडी : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळामार्फत आयोजित ‘पैठण औरंगाबाद’ येथे झालेल्या राज्यस्तरीय महिला भजन स्पर्धेत श्री सातपाटेकर भजन मंडळ निरवडेच्या बुवा कु. गौरी पारकरने कोकणचा ठसा उमटवला आहे. चिपळून येथे झालेल्या कोकण विभागीय स्पर्धेतून प्रथम येत या पैठण, औरंगाबाद येथे झालेल्या राज्यस्तरीय भजन स्पर्धेत कामगार कल्याणच्या सावंतवाडी केंद्रामधून सहभागी झालेल्या श्री राधाकृष्ण संगीत साधनाच्या विद्यार्थिनी आणि सातपाटेकर भजन मंडळ निरवडे कोनापालच्या बुवा कु. गौरी पारकर हिने नेत्रदीपक यश मिळवित तृतीय क्रमांकाच्या पारितोषिकाची विजेतेपद पटकाविले. तर वैयक्तिक तालसंचन प्रकारातही तिला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. याच स्पर्धेत गौरीच्या भजन मंडळाला पखवाज साथ करणारी श्री राधाकृष्ण संगीत साधना परिवारातील सदस्य ‘कु. प्राजक्ता परब’ सर्वोत्कृष्ट पखवाजवादक पारितोषिकाची विजेते ठरली.

कु. गौरी सावंतवाडी तालुक्यातील निरवडे गावची सुकन्या असून सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगी आहे. बुवा विजय माधव यांचे तिला यासाठी मार्गदर्शन लाभले तर श्री राधाकृष्ण संगीत साधनाच्या वीणा दळवी यांच्याकडे ती शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेत आहे. तर कु. प्राजक्ता परब वाफोली ता. सावंतवाडीची सुकन्या असून श्री आनंद मोर्ये सरांची विद्यार्थीनी आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कु. गौरीला कामगार कल्याणच्या अधिकारी श्रीम. नम्रता आरावेकर  यांचे सहकार्य लाभले. कु. गौरी पारकर, कु.प्राजक्ता परब आणि त्यांच्या सातपाटेकर भजन मंडळाचं या निमित्ताने सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.