…अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी छेडणार तीव्र आंदोलन.! ; सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयास राष्ट्रवादीचे विविध मागण्यांसाठी निवेदन सादर.

76

सावंतवाडी : ‘महाराष्ट्र माझा’च्या दणक्यानंतर आता सर्व स्तरावरून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेला धारेवर धरण्याचे सुरु झाले आहे. विविध पक्ष आणि पदाधिकारी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेबद्दल असंतोष व्यक्त करत आहेत. आज सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे भरणे, तसेच विविध आरोग्याच्या सोयी सुविधांबाबत तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहर अध्यक्ष देवेंद्र टेमकर, तालुका सरचिटणीस हिदायतुल्ला खान, महिला शहराध्यक्ष सायली दुभाषी, अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष इफ्तेकार राजगुरू, शहर चिटणीस राकेश नेवगी, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष जावेद शेख, तालुका उपाध्यक्ष याकुब शेख, युवक उपाध्यक्ष कृपेश राठोड आदी पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, आपल्या निवेदनात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने म्हटले आहे की, उपजिल्हा रुग्णालय, सावंतवाडी येथे बरीच रिक्त पदे आहेत. सध्यस्थितीत नेमलेले वैद्यकीय अधिकारी तसेच कर्मचारी हे पुर्ण वेळ नसल्यामुळे याचा फटका रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना बसत आहे. कॅज्युअल्टी विभागात दाखल झालेल्या सणांना प्रथमिक उपचार देत त्वरीत इतरत्र खाजगी रुग्णालयात किंवा गोवा बांबुळी येथे हलविण्यास सांगण्यात येते, हे सर्वसामान्य तसेच आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या जनतेला परवडणारे नसल्याने रूणांची हेळसांड होवून बरेच रुग्ण उपचाराअभावी दगावतात.

त्याचप्रमाणे सावंतवाडी उपजिल्हा स्णालयात औषधांचा अपुरा साठा असल्याने उपचार घेत असलेल्या रुणांना बाहेरुन औषधे आणण्यास सांगण्यात येते, यामुळे सर्वसामान्य तसेच आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या जनतेला आर्थिक भुर्दंड व त्रास सोसावा लागत आहे. ससर्वसामान्य जनतेला खाजगी रुणालयात जावून उपचार घेणे आर्थिक दृष्ट्या परवडणारे नसल्याने त्यांना सरकारी रुग्णालयांशिवाय पर्याय नसतो.

रुणालयातील अस्वच्छता, स्वच्छता गृहामध्ये पाणी नसणे यामुळे रुग्णांचे व नातेवाईकांचे हाल होतात. सणांना सेवा देणारे वॉर्ड स्टाफच्या कमतरतेमुळे उपचार घेत असलेल्या रुग्णांना सामान्य सोई सुविधा सुद्धा पुरविल्या जात नाही आहेत.

तरी वरील सर्व बाबींचा विचार करुन सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे तसेच वैद्यकीय सोई सुविधा येत्या पंधरा दिवसात पूर्तता करावी, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आपल्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास याची पूर्ण जबाबदारी आपली राहील.