रोहित शर्मासाठी शेवटची संधी.! ; पुढच्या आयसीसी स्पर्धेत हिटमॅन दिसणार नाही?

57

अहमदाबाद : भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा वर्ल्डकप फायनलापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत एकदम निवांत होता. त्याने सर्व प्रश्नांची दिलखुलास उत्तरे दिली. मात्र जवळपास 150 कोटी लोकांच्या अपेक्षांचं ओझं वाहणाऱ्या रोहितकडे वर्ल्डकप फायनल हरणं हा पर्यायच नाहीये. तसंच रोहितची ही शेवटची संधी आहे. कारण रोहित शर्मा 2024 चा टी 20 वर्ल्डकप खेळणार की नाही याबाबत बीसीसीआयकडून अजून कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. बीसीसीआय रोहित शर्माच्या भविष्याबाबत दक्षिण अफ्रिकेच्या दौऱ्यानंतर चर्चा करण्याची शक्यता आहे.

रोहित शर्मा आता 37 वर्षाचा झाला आहे. त्याचे चाहते तो अजून 3 वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकतो असं म्हणतात. त्या काळात भारतीय संघ तीन आयसीसी स्पर्धा खेळणार आहे. 2024 मध्ये टी 20 वर्ल्डकप, 2025 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी अन् जर क्वालिफाय झाले तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल. या तीनही स्पर्धांमध्ये रोहित शर्मा खेळण्याची शक्यता कमी आहे.

रोहित शर्माचा टी 20 मधील फॉर्म आता पूर्वीसारखा राहिलेला नाही. तो कसोटी क्रिकेट अजून दोन वर्षे खेळेल असे वाटत नाही. वनडे क्रिकेटबाबत देखील असंच आहे. त्यामुळे वर्ल्डकप जिंकण्याची ही रोहितकडे शेवटची संधी आहे.

रोहित एका फॉरमॅटमधून होणार निवृत्त –

2022 च्या टी 20 वर्ल्डकपमध्ये भारताला अपयश आल्यानंतर सर्व लक्ष हे वनडे वर्ल्डकपवर केंद्रित करण्यात आलं. त्यावेळीच रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी एक फॉरमॅटमधून निवृत्ती घ्यावी याबाबत चर्चा सुरू झाली होती. अजित अगरकरचे निवडसमिती अध्यक्ष म्हणून या दोघांशी याबाबत चर्चा करणे हे प्रमुख काम आहे.

दोन वर्षापूर्वी रोहितच्या सततच्या दुखापतींमुळे आणि खराब फॉर्ममुळे त्याची कारकीर्द फार राहिलेली नसल्याचे बोलले जात होते. मात्र आता वारा बदललं आहे. तो वर्ल्डकप 2023 मधील भारताचा अनसंग हिरो आहे. रोहितने 55 च्या सरासरीने 550 धावा केल्या असून त्याचे स्ट्राईक रेट 124.15 इतके आहे. त्याने 2023 मध्ये 33 आंतरराष्ट्रीय आणि 16 आयपीएल सामने खेळले आहेत. यामार्फत त्याने आपला फिटनेस सिद्ध करून दाखवला.