‘कडक सुरक्षेमुळे पाकिस्तानची खराब कामगिरी?’ ; कोचचे धक्कादायक विधान.

45

बेंगळुरू : एकदिवसीय वर्ल्ड कप 2023 मध्ये पाकिस्तान संघाकडून सर्वाना चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती, परंतु मैदानावर संघाची कामगिरी अत्यंत निराशाजनक होती. पाकिस्तानी संघ अद्याप उपांत्य फेरी गाठण्याच्या शर्यतीत असला तरी, त्यासाठी त्यांना उर्वरित सर्व सामने जिंकावे लागतील आणि इतर सामन्यांच्या निकालांवरही अवलंबून राहावे लागेल.

दरम्यान, पाकिस्तानी संघाचे संचालक मिकी आर्थर यांनी संघाच्या खराब कामगिरीबाबत आणखी एक धक्कादायक विधान केले आहे. ज्यात त्यांनी खेळाडूंभोवती अत्यंत कडेकोट सुरक्षा व्यवस्था हे प्रमुख कारण असल्याचे सांगितले आहे. वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानचा आठवा सामना न्यूझीलंडविरुद्ध आज बेंगळुरू येथे खेळणार आहे. या सामन्यापूर्वी पाकिस्तान संघाचे संचालक मिकी आर्थर म्हणाले, ‘आमच्यासाठी सर्वात कठीण गोष्ट म्हणजे आम्ही अत्यंत कडेकोट सुरक्षेमध्ये आहोत आणि खेळाडूंसाठी हे खूप कठीण आहे. आपण कोविड काळात परत आल्यासारखे वाटत आहे. तुम्ही हॉटेलमधील तुमच्या मजल्यापर्यंत आणि खोलीपर्यंत मर्यादित आहात. सुरक्षेची परिस्थिती अशी आहे की आमचा नाश्ताही वेगळ्या खोलीत होतो. एवढ्या प्रदीर्घ स्पर्धेदरम्यान खेळाडूंना एकमेकांना भेटण्यात अडचण येत आहे आणि याचाही परिणाम होतो.

पाकिस्तान संघ उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या आशेवर मिकी आर्थर म्हणाले की, वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानला पूर्ण क्षमतेने खेळताना आम्ही पाहिलेले नाही. बांगलादेशविरुद्धच्या गेल्या सामन्यात आम्ही चांगली कामगिरी केली होती. संघ आपल्या लयीत आहे आणि मला आशा आहे की खूप उशीर झालेला नाही.

पाकिस्तान संघ सध्या पॉइंट टेबलमध्ये सहाव्या स्थानावर आहे, ज्यामध्ये त्यांनी 7 पैकी फक्त 3 सामने जिंकले आहेत तर चारमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.