रोहा : शशिकांत मोरे
मराठा आरक्षणाचा विषय गंभीर होत चालला असून रोहयात सुरू असलेल्या उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी या समाज बांधवांमध्ये राज्यकर्त्यांबद्दल संतप्त वातावरण आहे, लोकप्रतिनिधी उपोषण स्थळी भेटण्यासाठी येत असल्याचे माहिती मिळताच लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी येऊ नये, नामुष्की करून घ्यायची असेल तरच त्यांनी उपोषणस्थळी यावे, असे मराठा समाजाने ठणकावले असून लोकप्रतिनिधी आल्यास आणि कोणताही अनुचित प्रकार घडल्यास याची सर्वस्व जबाबदारी प्रशासनाची असेल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आणि मराठा योद्धा मनोज जरांगेपाटील यांच्या समर्थनार्थ रोहा तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण सुरू केले, आज तिसऱ्या दिवशी नगर पालिका चौकात मोठ्या संख्येने लोक या साखळी उपोषणात सहभागी झाले. येथे उपोषण शांततेत सुरू असले तरी तीन दिवस अन्नत्याग करून आमरण उपोषणास बसलेल्या मराठा योद्धा राजेश काफरे यांची प्रकृती खालावल्याने मराठा समाजात संतप्त भावना आहेत.बुधवारी रात्री काफरे यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना चक्कर आली.त्यांची प्रकृती खालवल्याने काफरे यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

डॉक्टरांनी त्यांना उपोषणस्थळीच सलाईन लावण्याचा सल्ला दिला मात्र राजेश काफरे यांनी सलाईन लावण्यास नकार दिल्याने रोह्यातील मराठा समाजात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
याचवेळी रोह्यात शहर सभागृहाच्या ठिकाणी येणारे खासदार सुनिल तटकरे हे उपोषण स्थळी येण्याची शक्यता असल्याची माहिती येथे पसरली आणि उपोषण स्थळी चलबिचल सुरू झाली.आरक्षणाच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांबद्दल मराठा समाजात तीव्र नाराजी आहे. तीन दिवसापूर्वी ठाण्यात खा. सुनील तटकरे यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रकार घडलेला आहे.उपोषण स्थळी ” लोकप्रतिनिधींना बंदी” या आशयाचे मोठे बॅनर लागलेले आहे, तरीही तटकरे या ठिकाणी येत असल्याचे समजताच लोकप्रतिनिधींनी याठिकाणी येऊ नये, चले जावच्या घोषणा ऐकून नामुष्की करून घ्यायची असेल तरच त्यांनी उपोषणस्थळी यावे असे समाजाने ठणकावले होते तर याठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडल्यास याची सर्वस्व जबाबदारी प्रशासनावर असेल,असे जाहीर आवाहन मराठा समाजाने केले होते.
खासदार सुनिल तटकरे हे रोह्याचे सर्वेसर्वा आहेत,येथिल मराठा समाजाचे अनेक जण त्यांचे कार्यकर्ते,नेते आहेत,तटकरे प्रत्येक गोष्टीत राजकारण पाहत असतात, मराठा समाजाच्या आरक्षणाला आपला पाठिंबा असल्याचे जाहीर करण्यासाठी त्यांना उपोषणस्थळी यायचे होते,.त्यासाठी जवळच असलेल्या शहर सभागृहाच्या पाहणीचे निमित्त करण्यात आले होते, रोहयातील सर्व माजी नगरसेवक, नगरसेविका, राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आदींना त्यासाठीचे मेसेजेस पाठवून दुपारी चार वाजता अष्टमी रेल्वे फाटक येथे जमावे तिथून शहर सभागृह येथे जायचे आहे, असे कळविण्यात आले होते. परंतु मराठा समाज “लोकप्रतिनिधींना बंदी” या आपल्या भूमिकेवर ठाम राहिला आणि तसे जाहीररीत्या ठणकावण्यात आल्याने लोकप्रतिनिधींनी आपला मार्ग बदलून इतर ठिकाणी मार्गस्थ झाले.





