परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान.! ; भात पावसात भिजल्याने शेतकरी हवालदिल.

32

बांदा : सावंतवाडीत तालुक्यात सलग दोन दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. शेतात कापणीसाठी तयार झालेले भात पीक काही ठिकाणी जमीनदोस्त तर काही ठिकाणी सडून गेले. उन्हाचे चटके सहन करत कापलेले भात सोमवारी व मंगळवारी झालेल्या पावसात भिजल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. एकंदरीत शेती आता बेभरवशाची बनत असल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिल्या.
तालुक्यात भात कापणी जोरदार सुरू आहे. अनेक दिवसांपासून पाडलोस, मडुरा, न्हावेली, रोणापाल, कास, सातोसे, निगुडे, शेर्ले, बांदा, विलवडे, इन्सुली भागात शेतकरी कापणीत व्यस्त आहेत. मात्र, ऐन हंगामातच परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने कापणी केलेले पीक भिजले. ढगाळ वातावरण दिसू लागल्यामुळे शेतकऱ्यांनी पावसापासून पीक वाचविण्यासाठी धावपळ केली परंतु अति वेगाने मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात मुसळधार पाऊस सुरू झाला.
मडुरा पंचक्रोशीत काही ठिकाणी पूर्णपणे पिकलेले पीक सडून गेले तर काही ठिकाणी भाताला कोंब आलेत. मजूर मिळत नसताना हजारो रुपये खर्च करून पिकवलेली शेती परतीच्या पावसात भिजल्याने पैसे व शेतकऱ्याची मेहनतही वाया जाण्याची शक्यता आहे. मंगळवारी संध्याकाळपर्यंत पावसाचे वातावरण असल्याने तालुक्यात भात कापणी रखडली.