मुंबई : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. काही अज्ञात व्यक्तींच्या वतीनं हसन मुश्रीफांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. आकाशवाणी आमदार निवास इथे उभी असलेल्या मुश्रीफांच्या गाडीवर काही अज्ञात लोकांकडून दगडफेक करून गाडी फोडण्यात आली आहे. दरम्यान, याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
नेमकं काय घडलं ?
काही वेळापूर्वीच ही घटना घडली. साधारणतः सात, साडेसातच्या दरम्यान ही घटना घडली. तिथेच हसन मुश्रीफ यांची गाडी उभी होती. त्या गाडीवर दोन मराठा आंदोलकांनी हल्ला केला. त्यांनी गाडीची तोडफोड करण्यास सुरुवात केली. गाडीची पूर्ण तोडफोड करण्यात आली. गाडीच्या काचाही फोडण्यात आल्या. चौकशीनंतर ही गाडी मंत्री हसन मुश्रीफ यांची असल्याची माहिती मिळाली. काही मराठा आंदोलकांनी मंत्री मुश्रीफ यांची गाडी हेरुन गाडीवर हल्ला केला. ज्यावेळी हल्ला झाला, त्यावेळी तिथे पोलीस उपस्थित होते. पोलिसांनी तात्काळ आक्रमक मराठा आंदोलकांना ताब्यात घेतलं.





