अभिजीत नांदगावकर यांची उद्या रत्नागिरी आकाशवाणीवर गीते होणार सादर.!

20

रत्नागिरी : आकाशवाणी रत्नागिरी केंद्रावर 1 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजता गायक अभिजीत नांदगावकर यांची गीते सादर होणार आहेत.
आकाशवाणी केंद्रावर नुकतेच 25 ऑक्टोबर रोजी या गीतांचे ध्वनिमुद्रण करण्यात आले. गायक अभिजीत यांची “सख्या तुझी वाट पाहू किती?, दिवाळी आली दिवाळी, गा रे प्रभूचे गाणे” अशी तीन गाणी ध्वनिमुद्रित करण्यात आली आहेत. यातील “सख्या तुझी वाट पाहू किती?, दिवाळी आली दिवाळी” ही दोन नवी गाणी रसिक श्रोत्यांना ऐकायला मिळणार आहेत. या गीतांना अभिजीत यांनी शब्दबद्ध व संगीतबद्ध केले आहे.

गायक अभिजीत यांना हर्षल काटदरे यांनी हार्मोनियम, उदय गोखले यांनी व्हायोलिन, तर अभिषेक भालेकर यांनी तबलासाथ केली आहे. या गाण्यांचे ध्वनिमुद्रण व बॅलन्सिंग रत्नागिरीतील प्रसिद्ध शास्त्रीय गायक प्रसाद गुळवणी यांनी केले आहे. त्यांना प्रतिमा खानोलकर हिने सहकार्य केले.