कोमसाप सावंतवाडी शाखेच्या प्रथम कोजागरी संमेलनाला शाखेचे अध्यक्ष, सचिवांची दांडी.! ; वाय.पी नाईक यांच्या अध्यक्षतेखाली उपस्थित कवींनीच भरले कोजागरी संमेलनात रंग.!

159

सावंतवाडी : कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेचे प्रथम कोजागरी संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. आज सायंकाळी सावंतवाडी येथील राणी पार्वतीदेवी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित केलेल्या सावंतवाडी शाखेच्या या कवी संमेलना दस्तर खुद्द सावंतवाडी शाखेचे अध्यक्ष आणि सचिव यांनी मात्र सपशेल पाठ फिरवली. असे असतानाही कवी संमेलनाचे अध्यक्ष आणि सेवानिवृत्त राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त व कवी वाय. पी. नाईक यांच्या अध्यक्षतेखाली सदर संमेलन मात्र उत्साहात पार पडले. सदर संमेलन यशस्वी करावे असा गाजावाजा करणारे आणि सदर संमेलन उत्साहात पार पाडावे असे आवाहन करणाऱ्या कोकण मराठी साहित्य परिषदेचे विद्यमान अध्यक्ष आणि सचिवांनीच कवी संमेलनाकडे पाठ फिरवल्यामुळे उपस्थित कवींमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला. कारण आपल्याच कविता आपणच वाचाव्यात, आपणच सादर कराव्यात आणि आपणच टाळ्या वाजव्यात हे कोणत्याही साहित्यिकाला किंवा कवीला कवीच्या मनाला न पटणारे कृत्य आहे. मात्र हे घडले सावंतवाडीत आणि त्याचे ऐतिहासिक साक्षीदार झाले ते कवी संमेलनात सहभागी झालेले दुर्दैवी कवी. मात्र कार्यक्रमास उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, जिल्हा कोषाध्यक्ष भरत गावडे, सचिव कवी विठ्ठल कदम, प्रा. डॉ.जी. ए. बुवा, प्रा. डॉ. गणेश मर्गज, प्रा. एन. डी. कार्वेकर, सेवानिवृत्त शिक्षक श्री. गोवेकर यांसह काही साहित्यप्रेमी उपस्थित होते.

या कवींनी भरले रंग –

सदर कवी संमेलनात कवी संमेलनाचे अध्यक्ष वाय. पी. नाईक यांनी उपस्थित कवींना मार्गदर्शन करीत स्वतः माती आणि नातीशी जोड असणारी कविता सादर केली. त्यानंतर उपस्थित असलेले कवी आणि कवयित्री यांनी कोजागरी संमेलनात रंगत आणली.  यात कवी वाय.पी नाईक, मालवणी कवी रामदास पारकर, सद्याचे आघाडीचे कवी दीपक पटेकर, विठ्ठल कदम, प्रज्ञा मांतोडकर, ऋतुजा सावंत – भोसले, किशोर वालावलकर, मनोहर परब, स्वप्ना गोवेकर, मंगल नाईक, प्रा.रुपेश पाटील, दत्ताराम सावंत, संतोष पवार, आशा मुळीक, सुहासिनी सडेकर यांनी दर्जेदार कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली.