शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते प्राथमिक शिक्षक महेश सावंत सन्मानित.!

67

सावंतवाडी : नेमळे येथे कार्यरत असलेले प्राथमिक शिक्षक महेश लाडू सावंत यांना नाम. दीपकभाई केसरकर मित्रमंडळ आणि सिंधुदुर्ग जिल्हा मराठी अध्यापक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ‘गुरुसेवा सन्मान विशेष पुरस्कार २०२३’ देऊन महाराष्ट्राचे विद्यमान शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले. सदर पुरस्काराची घोषणा ५ सप्टेंबर २०२३ रोजी शिक्षकदिनी करण्यात आली होती.
श्री. महेश सावंत हे जि. प.शाळा नेमळे न.२ येथे कार्यरत असून सध्या तळवडे नं. ५ येथे कामगिरीवर कार्यरत आहेत. एक उपक्रमशील शिक्षक म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला आहे. बऱ्याच राज्यस्तरीय प्रशिक्षणांमधून सहभागी होऊन त्यांनी जिल्ह्यातील आणि तालुक्यातील शिक्षकांना मार्गदर्शन केले आहे व करत आहेत. एक उत्कृष्ट तंत्रस्नेही शिक्षक म्हणून ते कार्यरत आहेत. जिल्हास्तरीय नवोपक्रम स्पर्धेत अनेकदा क्रमांक प्राप्त करून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. शासनाच्या टॅग आणी मूक यासारख्या महत्वाच्या प्रकल्पांमध्ये त्यांनी समन्वयकाची भूमिका पार पाडली आहे. हल्लीच त्याचे ‘कोण होईल शिवज्ञानी’ हे छत्रपती शिवरायांवर आधारित पुस्तक प्रकाशित झाले आहे. तळवडे नं. ५ शाळेचे शा.व्या.समिती अध्यक्ष श्री. सखाराम तानाजी गावडे तसेच सर्व सदस्य यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
यापूर्वी त्यांना एस. आर. दळवी फाऊंडेशन, मुंबई यांचा राज्यस्तरीय महाशिक्षक पुरस्कार २०२१ मध्ये त्यावेळच्या महाराष्ट्राच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला होता. याशिवाय त्यांना राज्यस्तरीय डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन शिक्षकरत्न पुरस्कार तसेच राज्यस्तरीय महात्मा ज्योतीराव फुले शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला आहे. शिक्षक सक्षमीकरण आणि पर्यावरण याविषयी कार्य करणाऱ्या एस. आर. दळवी फाऊंडेशन या एनजीओ संस्थेचे राज्याध्यक्ष म्हणून हल्लीच त्यांची निवड करण्यात आली आहे.
यावेळी व्यासपीठावर यावेळी व्यासपीठावर माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सुकाणू समिती सदस्य भरत गावडे, कवी विठ्ठल कदम, प्रा. रुपेश पाटील, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अशोक दळवी, गणेश प्रसाद गवस, केंद्रप्रमुख म. ल. देसाई, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सुकाणू समिती सदस्या व राज्य आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त प्रा. सुषमा मांजरेकर, विशाखा पालव, श्री. गोवेकर सर आदि उपस्थित होते.

दरम्यान महेश सावंत यांचे एस. आर. दळवी फाऊंडेशन, मुंबईचे सर्वेसर्वा आबासाहेब दळवी, सौ. सीता दळवी आणि संपूर्ण एस. आर. दळवी फाऊंडेशन टीम तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व स्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहे.