नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिरातील राम लल्लाच्या मूर्ती प्रतिष्ठापणेची वेळ आणि तारीख ठरली आहे. २२ जानेवारी २०२४ ला दुपारी १२.३० वाजता मूर्ती स्थापना होणार आहे. राम मंदिर ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पंतप्रधानांना निमंत्रण दिले. मोदींनी हे निमंत्रण स्विकारलं आहे. २२ तारखेपासून राम भक्तांसाठी मंदिर खुलं होणार आहे. देशातील सगळ्या राज्यांचे राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना निमंत्रण दिले जाणार आहे. देशातील प्रसिद्ध क्रीडापटू, साहित्यिक, वरिष्ठ पत्रकारांनाही कार्यक्रमाचे निमंत्रण दिले जाणार आहे. राम मंदिराच्या आंदोलनात ज्या कारसेवकांचा मृत्यू झाला होता त्यांच्या नातेवाईकांनाही निमंत्रण दिले जाणार आहे. उद्घाटनाचे प्रसारण देश-विदेशात लाईव्ह केले जाणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निमंत्रण मिळाल्याची माहिती एक्सवरुन दिली आहे. ते म्हणाले की, ‘जय सियाराम! आजचा दिवस भावनांनी भरलेला आहे. आज श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे पदाधिकारी मला भेटण्यासाठी माझ्या निवासस्थानी आले होते. त्यांनी मला श्रीराम मंदिराच्या मूर्ती प्रतिष्ठापणेच्या क्षणासाठी अयोध्येत येण्याचे निमंत्रण दिले आहे.’
मी स्वत:ला खूप भाग्यवान समजतो. माझं भाग्य आहे की माझ्या जीवनकाळात, मी या ऐतिहासिक क्षणांचा साक्षीदार असेल, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे बाबरी मशिदीच्या ठिकाणी राम मंदिर बांधण्यासाठी सुप्रीम कोर्टाने परवानगी दिली होती. त्यानंतर राम मंदिराचे निर्माण कार्य हाती घेण्यात आले होते. राम मंदिरातील मूर्तीच्या प्रतिष्ठापणेसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. अनेक महत्त्वाच्या नागरिकांना या कार्यक्रमासाठी बोलावण्यात आले आहे. ऐतिहासिक सोहळा करण्यासाठी सर्व प्रकारची तयारी करण्यात आली आहे. त्यामुळे या कार्यक्रमाकडे संपूर्ण देशाचं लक्ष असणार आहे.





