सावंतवाडी : भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी खासदार निलेश राणे यांनी दसऱ्याच्या दिवशी भारतीय जनता पार्टी आणि आपल्या चाहत्यांना कमालीचा धक्का दिलाय. आपल्या ट्विटर वरून आपण राजकीय क्षेत्रापासून अलिप्त होत असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.
आपल्या ट्विटमध्ये स्वतः माजी खासदार निलेश राणे म्हणतात –
नमस्कार, मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे, आता राजकरणात मन रमत नाही, इतर काही कारण नाही.
मागच्या १९/२० वर्षा मध्ये आपण सगळ्यांनी मला खूप प्रेम दिलं, कारण नसताना माझ्या सोबत राहिलात त्या बद्दल मी आपला खूप आभारी आहे. BJP मध्ये खूप प्रेम भेटलं आणि BJP सारख्या एका उत्तम संघटनेत काम करण्याची संधी मिळाली त्या बद्दल मी खूप नशीबवान आहे.
मी एक लहान माणूस आहे पण राजकरणात खूप काही शिकायला मिळालं आणि काही सहकारी कुटुंब म्हणून कायमचं मनात घर करून गेले, आयुष्यात त्यांचा मी नेहमी ऋणी राहीन. निवडणूक लढवणं वगैरे यात मला आता रस राहिला नाही, टीका करणारे टीका करतील पण जिथे मनाला पटत नाही तिथे वेळ स्वतःचा आणि इतरांचा वाया घालवणे मला पटत नाही. कळत नकळत मी काही लोकांना दुखावलं असेल त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो.
तुम्हा सर्वांना माझ्या शुभेच्छा.
जय महाराष्ट्र!

दरम्यान निलेश राणे यांच्या या ट्विट मुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजली असून अनेकांना त्यांच्या या ट्विटमुळे चांगलाच धक्का बसला आहे.





