साळशी हायस्कूलमध्ये ‘सायबर सिक्युरिटी’ विषयावर जनजागृती, मार्गदर्शन संपन्न.!

71

देवगड : साळशी हायस्कूलमध्ये पोलीस देवगड व एमकेसीएल, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सायबर सिक्युरिटी आणि जनरल अवेअरनेस’ या उपक्रमांतर्गत प्रशालेच्या सर्व विद्यार्थ्यांना सायबर क्राईमविषयी उद्बबोधनपर मार्गदर्शन करण्यात आले.
या जनजागृती सेशनसाठी देवगडचे पोलीस उपनिरीक्षक एस. जी. भालेराव यांनी ‘सायबर गुन्हेगारी’पासून स्वतःला सुरक्षित कसे ठेवावे?, याविषयावर जनजागृतीपर अनेक उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना उपयुक्त मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांच्या विविध शंकाविषयी निरसन केले. यावेळी देवगड पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार महेंद्र महाडिक उपस्थित होते.


एमकेसीएल प्रतिनिधी महेश चौकेकर यांनी विविध प्रकारच्या व्हिडिओ क्लिपद्वारे, अनेक प्रकारच्या घडलेल्या सायबर गुन्ह्यांविषयी, तसेच याविषयी घ्यावी लागली जाणारी काळजी, या विषयावर अतिशय जनजागृतीपर मार्गदर्शन केले.
या जनजागृती कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रशालेचे मुख्याध्यापक माणिक वंजारे यांनी उपस्थित सर्व पोलीस कर्मचारी आणि एमकेसीएलचे प्रतिनिधी यांचे स्वागत करुन या उपक्रमाच्या उद्देशाविषयीचे प्रास्ताविक केले. या जनजागृतीपर मार्गदर्शनानंतर शेवटी देवगड पोलीस उपनिरीक्षक एस. जी. भालेराव यांनी उपस्थित सर्वांना सायबर गुन्ह्यांपासून सावधगिरी बाळगावी या विषयीची प्रतिज्ञा दिली. शेवटी मुख्याध्यापक माणिक वंजारे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले व कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. सदर उपक्रमासाठी स्कूल कमिटीचे चेअरमन सत्यवान सावंत हे आवर्जून उपस्थित होते.


शेवटी सर्व विद्यार्थ्यांची सायबर सिक्युरिटी प्रश्नमंजुषा -2023 ही परीक्षा घेण्यात आली.