वेंगुर्ला : वेंगुर्ला तालुक्यातील अत्यंत नयनरम्य आणि तेवढेच पर्यटकांच्या पसंतीस उतरलेले गाव म्हणजे रेडी होय. मात्र अलीकडच्या काळात रेडी येथील श्री देवी माऊली मंदिर ते श्री गणपती मंदिर रस्ता अत्यंत जीवघेणा झाला आहे. या रस्त्याचे नूतनीकरण व्हावे, यासाठी अनेकदा रेडी ग्रामस्थांनी जबाबदार असलेल्या महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, रेडी या कार्यालयाला पाठपुरावा केला आहे. मात्र असे असतानाही ग्रामस्थांच्या निवेदनानुसार 2021 पासून सिमेंटीकरण व्हावे, यासाठी ग्रामस्थांचा संघर्ष सुरूच आहे. त्यांनी केलेला पाठपुरावा ग्राह्य धरत सदर रस्त्याला लवकरच दुरुस्त आणि वाहतुकीस योग्य असा रस्ता तयार केला जाईल, असे तोंडी आश्वासन संबंधित जबाबदार असलेल्या अधिकारी वर्गाकडून दिले गेले असे असतानाही अद्याप रस्त्याची परिस्थिती ‘जैसे थे’च आहे. ह्याच पार्श्वभूमीवर सदर रस्त्यावरील वाहतुकीमुळे मोठ्या प्रदूषणाचा सामना ग्रामस्थांना आणि पर्यटकांना करावा लागत आहे.

आज सदर रस्ता वाहतुकीस अत्यंत अयोग्य झाला असून पायी चालणे देखील कठीण झाले आहे. माहे ऑक्टोबर ते मे महिन्यापर्यंत मोठ्या प्रमाणात येथे मायनिंग व्यवसाय सुरू असल्याने वाहनांची वर्दळ असते. याच कारणामुळे हा रस्ता सिमेंटीरण करण्याची मागणी तमाम रेडीवासियांची आहे. रेडी पोर्टकडून देखील सिमेंटीकरण करण्यासाठी प्रयत्न चालू असल्याचे तोंडी आश्वासन देण्यात आले होते. तसेच याबाबत सिंधुदुर्गातील ठेकेदारांकडून संबंधितांनी कोटेशन देखील मागविण्यात आले होते. मात्र गेल्या आठवड्यात सदर रस्ता डांबरीकरण केला जाणार आहे, असे रेडी ग्रामस्थांना तोंडी सांगण्यात आले. याच अन्यायकारक कारणावरून रेडी ग्रामस्थ आज आक्रमक झाले आहेत. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या या चालढकल वृत्तीमुळे येथील ग्रामस्थ आणि सरपंचांच्या भावनांशी खेळ करत असल्याचा आरोप करत तमाम रेडीवासियांनी बंदर निरीक्षक महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड रेडी यांना निवेदनाद्वारे जाब विचारला आहे.

याबाबत आज त्यांनी आपले लेखी निवेदनही संबंधितांना सादर केले आहे. यावेळी रेडी ग्रामपंचायतचे सरपंच रामसिंग राणे, उपसरपंच नमिता नागोळकर, ग्रामपंचायत सदस्य सागर रेडकर, स्वप्निल राणे, चक्रपाणी गवंडी, वैभव आसोलकर, निलेश रेडकर, गुणाजी मांजरेकर, भूषण मांजरेकर, तुकाराम नाईक, नामदेव राणे, श्रीकांत राऊत, जगदीश गवंडी, अशोक राणे, नितीन सावंत, शैलेश गवंडी, अनंत कांबळी, शैलेश बुगडे, संदीप कांबळे, शिवा सूर्याजी, लतेश सूर्याची, पंकज सूर्याजी, परेश सूर्याची, सौरभ नागोळकर, नंदकुमार मांजरेकर, प्रल्हाद रेडकर, अभिजीत राणे, अमर रेडकर, आनंद आसोलकर, अधिक आजगावकर यांसह अनेक सामाजिक कार्यकर्ते तसेच तमाम रेडी ग्रामस्थ आणि भाविक यांनी संबंधितांना निवेदनाद्वारे जाब विचारला आहे.
दरम्यान संबंधितांनी लवकरात लवकर आपल्या निवेदनाची योग्य ती दखल घेतली नाही तर ग्रामपंचायतस्तरावर कंपनीचा निषेध ठराव मंजूर करून ही कंपनी रेडी येथून हाकलण्याचा मानस असल्याचे संतप्त ग्रामस्थांनी ‘महाराष्ट्र माझा’ जवळ आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.





