बांदा : बांदा केंद्रशाळेच्या पालकांनी शाळा बंद आंदोलन करण्यापूर्वी आमच्याशी चर्चा केली असती तर आंदोलनाचा प्रश्नच उद्भवला नसता. श्री मंगेश रघुनाथ कामत चॅरिटेबल ट्रस्टकडून जि. प. इमारतीची चावी शिक्षण प्रसारक मंडळ बांदाच्या अध्यक्षांकडे १ नोव्हेंबर रोजी सुपूर्द करणार आहोत. आमच्यावर खोटे व खोडसाळ आरोप करणार्यांचा योग्यवेळी योग्य पद्धतीने समाचार घेणार, असा इशारा कामत चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन मंगेश कामत यांनी दिला आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेची चार वर्गखोल्यांची इमारत भाडेकराराने शिक्षण प्रसारक मंडळाकडे दिलेली आहे. सदर इमारतीत कामत चॅरिटेबल ट्रस्टच्या व्ही. एन. नाबर इंग्लिश मिडीयम प्रशालेचे वर्ग सुरु आहेत. सदर ट्रस्टकडून इमारतीचे भाडे नियमितपणे भरण्यात येत आहे. सदर जि. प. अखत्यारीतील इमारत बांदा केंद्रशाळेला मिळावी यासाठी शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी शाळा बंद आंदोलन छेडले होते. मात्र या आंदोलनामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होईल अशी भूमिका घेऊन माजी विद्यार्थ्यांनी आंदोलनाला विरोध केला. यामुळे पालक व माजी विद्यार्थ्यांमध्ये तणाव निर्माण झाला होता.
या पार्श्वभूमीवर कामत चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन मंगेश कामत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, बांदा केंद्रशाळेचा मी सन १९४७ चा माजी विद्यार्थी आहे. माझी मुले सुद्धा याच शाळेत शिकली. वर्षभरापूर्वी शाळेच्या भौतिक सुविधांसाठी कामत कुटुंबियांकडून देणगीही दिली. या शाळेबद्दल वाईट हेतू असण्याचा प्रश्नच नाही. मोडकळीस आलेल्या इमारतीवर सुमारे ४ लाख खर्च करुन सुस्थितीत केली. स्वच्छतागृहासह भौतिक सुविधा पुरविल्या. लहान मुलांची शहरानजीक शिक्षणाची सोय व्हावी यासाठी शिक्षण प्रसारक मंडळाकडून ही इमारत घेतली होती. कामत चॅरिटेबल ट्रस्टचा थेट संबंध नाही. पालकांनी आंदोलनापूर्वी आमच्याशी चर्चा केली असती तर आंदोलनाची परिस्थिती आलीच नसती असे त्यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले, कामत चॅरिटेबल ट्रस्टने १ नोव्हेंबर रोजी सदर इमारतची चावी शिक्षण प्रसारक मंडळाकडे देण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्यावर खोटे आरोप करण्यात आले. नफा कमविणे हा आमचा कधीही हेतू नाही. धनदांडगे असल्याचा आरोप झाला. आम्ही धनदांडगे आहोत, मात्र आरोप करणार्यां प्रमाणे लांडगे नाहीत असेही त्यांनी सुनावले.
Home Uncategorized खोडसाळ आरोप करणार्यांचा योग्यवेळी समाचार घेणार.! ; कामत चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन मंगेश...





