सावंतवाडी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत क्रीडा अधिकारी कार्यालय, सांगली आयोजित कोल्हापूर विभागीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी कु. पांडुरंग संताजी पाटकर याने १४ वर्षाखालील मुलांच्या गटात थाळीफेक मध्ये ३६.३९ मीटर थाळी फेकून द्वितीय क्रमांक प्राप्त करून शाळेचे व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे. २९ ऑक्टोबर रोजी चंद्रपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेसाठी पाटकर याची निवड झाली आहे.

तसेच कुरुंदवाड येथे झालेल्या विभागीय शालेय मैदानी वेटलिफ्टींग स्पर्धेत १७ वर्षाखालील ७३ किलो वजन गटात ८० किलो वजन उचलून कुमार रोहन रामचंद्र गावडेने विभागीय स्पर्धेत पाचवा क्रमांक मिळविला.
कुमारी आर्या आप्पा कापडी हिने १५०० मी. धावणेमध्ये १७ वर्षाखालील मुलींच्या गटात जिल्ह्यात द्वितीय क्रमांक प्राप्त केला होता. ती देखील विभागस्तरावर खेळली व शाळेच्या लौकिकास पात्र ठरली आहे.
दरम्यान, राज्यस्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेसाठी पांडुरंग संताजी पाटकर याची निवड झाल्याबद्दल नेमळे विद्यालय ते श्री विठ्ठल रखुमाई मंदिर कामळेवीर पर्यंत जंगी मिरवणूक कारण्यात आली. यावेळी शाळेतील पाचवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभाग घेतला होता.
पांडुरंग संताजी पाटकर याची राज्यस्तरीय सार्धेसाठी निवड झाल्याबद्दल नेमळे पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आ. भि. राऊळ यांनी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व पेढे भरवून पाटकरचा सत्कार केला.
तसेच रोहन रामचंद्र गावडे, आर्या आप्पा कापडी व मार्गदर्शक क्रीडाशिक्षक आर. के. राठोड यांचाही सत्कार केला.
यावेळी प्राचार्या श्रीमती कल्पना बोवलेकर, राजेश गुडेकर, अनिल कांबळे, एम. पी. सारंग, यु. यु. राऊळ, नितीन थामापूरकर, लवू जाधव, नेत्रा चव्हाण, सी. टी. बंग, पांडुरंग दळवी, कासार मॅडम, आरती कोरगावकर, आर. एस आर, डी. आर. एस, सावंत मॅडम, दिलीप मेस्त्री , तुकाराम घोगळे इत्यादी उपस्थित होते





