शिवरायांचे जन्मस्थान हे संघर्ष अन् ऊर्जेचे स्थान ! – मनोज जरांगे पाटील.

26

जुन्नर : आरक्षणाचे आंदोलन गालबोट लागून हिसंक होणार नाही याची काळजी घेताना मराठा तरुणांनी आत्महत्येचे विचार मनात आणू नये, अशी कळकळीची विनंती मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी येथे केली. शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी पंचलिंग रस्ता चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर सकल मराठा समाजाला उद्देशून ते बोलत होते.त्यापूर्वी त्यानी शिवनेरीवरील शिवाई मातेचे दर्शन घेतले व शिवजन्मस्थळास वंदन केले. जरांगे म्हणाले, मराठा समाजातील प्रत्येक तरुणाने घरा-घरात जाऊन आरक्षण कशासाठी मागतोय सांगुन जनजागृती करावी. आरक्षणाची चळवळ उभी राहण्यासाठी मदत करावी. तुमचं हे लेकरू तुम्हाला आरक्षण मिळवून दिल्याशिवाय शांत बसणार नाही. श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान संघर्ष आणि ऊर्जेचे स्थान असल्याने ही प्रेरणा घेऊन पुढे जात आहे, असे ते म्हणाले.

आपल्याला आरक्षणासाठीचे आंदोलन शांततेच्या मार्गाने करायचे आहे. आरक्षण मिळाल्याशिवाय सरकारला सुट्टी नाही.२४ ऑक्टबरपर्यंत तारखे पर्यंत सरकारची वाट पाहिली जाईल.त्यानुसार आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाईल, असेही जरांगे यांनी स्पष्ट केले.