Home आंतरराष्ट्रीय इस्राइलचा गाझावर चौफेर हल्ला, हजारोंचा बळी.! ; आईस्क्रीम ट्रकमध्ये मृतदेह.

इस्राइलचा गाझावर चौफेर हल्ला, हजारोंचा बळी.! ; आईस्क्रीम ट्रकमध्ये मृतदेह.

63

जेरूसलेम : 7 ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या इस्राइल-हमास युद्धाला आज आठ दिवस पूर्ण झाले आहेत. या युद्धामध्ये आतापर्यंत हजारोंचा बळी गेला आहे. हमासने केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इस्राइल आपली पूर्ण ताकद लावून गाझा पट्टीवर हल्ला करत आहे. यात हमासच्या दहशतवाद्यांसह हजारो पॅलेस्टिनी नागरिकांचा देखील बळी गेला आहे. इस्राइलने गेल्या 24 तासांमध्ये इस्राइलने गाझा सिटी, खान यूनिस आणि इतर कित्येक ठिकाणी बॉम्ब हल्ले केले. यामध्ये हमासच्या दहशतवाद्यांसह 400 हून अधिक पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला, तर 1500 लोक जखमी झाले.

आईस्क्रीम ट्रकचा वापर – 

गाझामधील सर्व शवाघरं भरली आहेत. त्यामुळे कित्येक ठिकाणी मृतदेह ठेवण्यासाठी आईस्क्रीम ट्रकचा वापर करण्यात येतो आहे. मृतदेह कुजू नये यासाठी हे करत असल्याचं स्थानिक माध्यमांनी दिलेल्या रिपोर्टमध्ये याबाबत माहिती देण्यात आली आहे.

आतापर्यंत किती बळी?

या युद्धामध्ये आतापर्यंत 2,215 पॅलेस्टिनी नागरिकांचा बळी गेला आहे. तर पॅलेस्टाईनमध्ये जखमींची संख्या 8,714 एवढी आहे. बळींमध्ये 700 लहान मुलांचा देखील समावेश आहे. दुसरीकडे इस्राइलमध्ये आतापर्यंत 1,300 नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर 3,400 नागरिक जखमी आहेत.

आंतरराष्ट्रीय पडसाद – 

पॅलेस्टाईन अथॉरिटीचे राष्ट्रपती महमूद अब्बास यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासोबत चर्चा केली आहे. इस्राइलने गाझा पट्टीमध्ये जाणारी सर्व रसद बंद केल्यामुळे. याठिकाणी ह्यूमन कॉरिडोअर उघडण्याची मागणी अब्बास यांनी बायडेन यांना केली.

दुसरीकडे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी हे युद्ध थांबण्यासाठी मध्यस्थी करण्याची इच्छा व्यक्त केली. पुतीन यांच्या वक्तव्याचं हमासने स्वागत केलं आहे.

सर्व दिशांनी हल्ल्याची तयारी – 

इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी गाझा सीमेचा दौरा करुन सैन्याचं मनोबल वाढवलं. इस्राइलचं सैन्य आता गाझामध्ये समुद्रमार्गे, हवाई मार्गे आणि जमीनीवरुन हल्ला करण्याची तयारी करत आहे. यासाठी हजारोंच्या संख्येने राखीव दलाला पाचारण केलं जात आहे. इस्राइलवर असा आरोप केला जातो आहे, की ते गाझा पट्टीतील नागरिकांवर व्हाईट फॉस्परसचा वापर करत आहेत. सामान्य नागरिक राहत असलेल्या ठिकाणी या पदार्थाच्या वापरावर जागतिक स्तरावर बंदी आहे. मात्र, इस्राइलच्या सैन्याने हे आरोप फेटाळले आहेत.