आगामी निवडणुकांमध्ये आपली नाराजी लोकशाही पद्धतीने दाखवा, राष्ट्रवादी काँग्रेसला साथ द्या.! – माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील. ; सावंतवाडीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी व कार्यकर्ता मेळावा संपन्न.

76

सावंतवाडी : 2024 च्या खासदार निवडणूकीत तसेच आगामी प्रत्येक निवडणुकीत आपण योग्य भूमिका घेऊन ‘इंडिया’ आघाडीला निवडून द्या. आपल्याला अपेक्षित विकास करून दाखवू. आपली नाराजी लोकशाही पद्धतीने आगामी निवडणुकीत दाखवून द्या. कोकण ही भूमी विचारवंतांची भूमी आहे. बॅरिस्टर नाथ पै, प्रा. मधुजी दंडवते यांसारखे नेतृत्व आपल्या आशीर्वादाने महाराष्ट्र राज्याला लाभले. तसेच नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आपणास निवडून द्यायचे आहे. आज कोकणसारख्या प्रांताला अर्चना घारे यांच्यासारखे नेतृत्व मिळत आहे हे आशादायी आहे. आपण यापुढे देखील आम्हाला साथ द्या. नवीन पक्ष प्रवेश केलेल्या कारकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना सन्मानाने वागणूक दिली जाणार, अशी ग्वाही देतो, असे प्रतिपादन राज्याचे माजी सहकार मंत्री तथा आमदार बाळासाहेब पाटील यांनी सावंतवाडी येथे केले.

आज सावंतवाडीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट ) सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी व कार्यकर्ता मेळावा येथील रवींद्र मंगल कार्यालयात संपन्न झाला. यावेळी माजी सहकार मंत्री तथा आमदार बाळासाहेब पाटील यांनी कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांना मार्गदर्शन केले.

 

यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री बाळासाहेब पाटील, कोकण महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षा अर्चना घारे, जिल्हाध्यक्ष अमित सामंत, माजी मंत्री प्रवीण भोंसले, व्हिक्टर डॉन्टस, प्रसाद रेगे, शेखर माने, नम्रता कुबल, सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, अनंत पिळणकर, सावली पाटकर, हिदायतुला खान, माजी नगरसेविका अफरोज राजगुरू, जावेद शेख यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी माजी मंत्री बाळासाहेब पाटील पुढे म्हणाले, आमचं सरकार हेच खरं जनतेच्या मनातील सरकार होते. पण दुर्दैवाने भाजपने कूटनीती वापरून सत्तेत आले. आमच्या पक्षाने पुरोगामी विचार कधीच सोडला नाही. सत्तेत असलेल्या सरकारने जाणीवपूर्वक निवडणूका पुढे पुढे ढकलल्या आहेत. कारण जनतेचा रोष कमी करता यावा. जनतेला या सरकारने कधीच न्याय दिला नाही. आज राज्यातील प्रशासन अत्यंत निकृष्ट झालं आहे. काल सावंतवाडी शहराने हे अनुभवलं आहे. आदरणीय शरद पवार साहेबांनी नेहमीच शेतकऱ्यांच्या विकासासाठी विचार केला. मात्र आताचे सत्ताधारी फक्त राजकारणापलीकडे आणि प्रसिद्धी पलीकडे काहीच करीत नाही. आगामी काळात आपण सावध राहणे गरजेचे आहे. अर्चना घारे हे अभ्यासू नेतृत्व आहे. पक्ष वाढविण्यासाठी त्या सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यांना पक्ष निश्चित न्याय देणार. आता मूळ पवार साहेबांना मानणारी मंडळी हिच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे. आपण महाविकास आघाडीवर विश्वास ठेवा, आम्ही आपणांस निराश निश्चित करणार नाहीत. इंडिया आघाडीला मिळणारा प्रतिसाद मोदी शासनाला धडकी भरवणारा आहे, असेही आम. पाटील यांनी सांगितले.

यावेळी जिल्हाध्यक्ष अमित सामंत म्हणाले की, सावंतवाडी मतदार संघासाठी अर्चना घारेच उमेदवार असतील, असं आम्हाला आश्वासन हवं आहे. आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनता सत्ताधारी लोकांना कंटाळली आहे. म्हणून लोकांना आता नव्या नेतृत्वाची गरज आहे.

लाभाचे पद नसतांना सावंतवाडी मतदारसंघात राष्ट्रवादी वाढविण्याचे आम्ही काम करत आहे. येणाऱ्या काळात चोवीस तास काम करुन अजून राष्ट्रवादी वाढविण्याची तयारी ठेऊ फक्त वरिष्ठांनी पाढबळ आणि आदर्शवाद द्या, अशी मागणी कोकण विभागीय महीला अध्यक्ष अर्चना घारे – परब यांनी केली.

यावेळी दोडामार्ग अध्यक्ष संदीप गवस म्हणाले, आज सर्वासामान्य माणसाचे जगणे महागाईने मुश्किल केलं आहे. अर्चना घारे यांनाचं आमदारकीचे तिकीट द्यावे, आम्ही त्यांना निवडून आणू.. अत्यंत सक्षम पद्धतीने घारे मॅडम कामं करताहेत त्यांना आपल्या पक्षाकडून न्याय मिळाला पाहिजे. संकटात धावून जात सौ. घारे ह्याच मदत करतात.

कणकवली तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर म्हणाले की, वरच्या स्तरावरून जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना मदत मिळावी, आम्ही स्वाभिमानी आहोत, जे गेलेत ते फुटीरवादी होते. आज पोलिसांना कोणाचा धाक राहिला नाही.

दरम्यान सदर मेळाव्यात जिल्हा बँकेचे संचालक व्हिक्टर डॉन्टस, माजी मंत्री प्रवीण भोंसले,  रूपेश जाधव, विशाल जाधव, बाळ कनयाळकर, योगेश कुबल यांनीही मनोगते व्यक्त केलीत.

कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रसाद रेगे यांनी केले. सूत्रसंचालन दत्ता सामंत यांनी तर आभार प्रदर्शन पुंडलिक दळवी यांनी केले.

दरम्यान, मेळाव्यात अनेक कार्यकर्त्यांनी माजी मंत्री पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केले.