विद्यार्थ्यांना गौतमी पाटीलचा नाच दाखवणार काय? ; शरद पवारांची खरमरीत टीका.

32

अकोला :  शाळांचे खासगीकरण सुरू आहे. मद्यसम्राटांच्या हातात शिक्षण संस्था दिल्या जात आहे. ते शाळांमध्ये गौतमी पाटीलच्या नृत्याचे कार्यक्रम आयोजित करतात. नेमके यातून काय साध्य करावयाचे आहे? विद्यार्थ्यांना कोणते संस्कार यातून देणार आहात, असा प्रश्न उपस्थित करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी राज्य सरकारच्या धोरणावर खरमरीत टीका केली.

अकोला जिल्हा दौऱ्यावर असताना दी जिल्हा मध्यवर्ती सरकारी बॅंकेचे अध्यक्ष डॉ. संतोष कोरपे यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नाशिक जिल्ह्यातील एक शाळा द्राक्षापासून मद्य तयार करणाऱ्या एका कंपनीला चालविण्यासाठी दिली. या कंपनीने शाळेत नृत्यांगना गौतमी पाटील हिचा कार्यक्रम आयोजित केला. त्यावर टीका करताना शिक्षणाच्या खासगीकरणामुळे काय होईल, याकडे माध्यमांचे लक्ष वेधले. शैक्षणिक संस्थांचे पावित्र अबाधित ठेवा, अशी विनंतीही पवारांनी केली.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे. याबाबत पवार यांना विचारणा केली असता सध्या सत्तेत असलेल्यांना विजयाची खात्री नाही. त्यामुळे ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास टाळाटाळ करीत आहेत. सत्ताधाऱ्यांना निवडणूक घेण्यास हरकत काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

आगामी निवडणुकांबाबत बोलताना पवार म्हणाले की, देशातील ७० टक्के राज्यात भाजपची सत्ता नाही. त्याचा परिणाम काय होईल, हे पुढे दिसून येईलच. इंडिया आघाडीला पंतप्रधानपदासाठी चेहरा देण्याची गरज नाही. निवडणुकीनंतर काय ते ठरविले जाईल. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील आणि मंत्री अनिल देशमुख, डॉ. संतोषकुमार कोरपे, माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे, अकोला जिल्हाध्यक्ष संग्रामभैय्या गावंडे उपस्थित होते.

ते ‘यूएन’चे अध्यक्षही लिहू शकतात –

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष असा उल्लेख केला आहे. त्यावर भाष्य करताना शरद पवार म्हणाले की, ते स्वतःला संयुक्त राष्ट्रसंघाचे अध्यक्षही लिहू शकतात. मी राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष असून, प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटील हे माझ्यासोबत आहे व आमची भूमिका स्पष्ट आहे. खासदार सुप्रिया सुळे यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव हा छगन भुजबळ यांचाच होता, असा खुलासाही पवार यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात केला.

आंबेडकरांबाबतचा निर्णय इंडिया आघाडीत –

वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यासारखे नेते इंडिया आघाडीत असणे आवश्यक आहे. मात्र, त्यांच्या इंडिया आघाडीतील प्रवेशाचा निर्णय हा आघाडीतील नेत्यांना एकत्रित बसून घ्यावा लागणार आहे. आतापर्यंत इंडिया आघाडीची बैठक झाली नाही त्यामुळे त्यांचा आघाडीतील प्रवेशाचा निर्णय होऊ शकला नाही. तो निर्णय घेण्याचा अधिकार मला एकट्याला नाही, असे पवार यांनी स्पष्ट केले.