नवी दिल्ली : दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर भारतीय संघाने अफगानिस्तानचा आठ विकेट आणि 15 षटके राखत पराभव केला. रोहित शर्माच्या वादळी खेळीच्या बळावर भारताने विश्वचषकात सलग दुसरा विजय नोंदवला. अफगाणिस्तानविरोधात श्रेयस अय्यर याने 25 धावांची छोटेखानी खेळी केली. या खेळीमध्ये अय्यरने एक षटकार आणि एक चौकार लगावला. अय्यरने लगावलेल्या त्या एका षटकाराची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. कारण, यंदाच्या विश्वचषकातील सर्वात लांब षटकार मारण्याचा रेकॉर्ड श्रेयस अय्यरच्या नावावर झाला आहे.
273 धावांचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि ईशान किशन तंबूत परतले. त्यानंतर अखेरीस श्रेयस अय्यर आणि विराट कोहली यांनी भारताला विजय मिळवून दिला. अय्यरने 25 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. अय्यरने मुजीबच्या चेंडूवर गगनचुंबी षटकार मारला. या षटकाराची लांबी तब्बल 101 मीटर इतकी होती. आताच्या विश्वचषकातील हा सर्वात लांब षटकार होय. दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या रोहित शर्मा आहे. रोहित शर्माने अफगाणिस्तानविरोधात 93 मीटर षटकार मारला. तिसऱ्या क्रमांकावर मार्को जनसन आहे, त्याने 89 मीटर दूर षटकार मारला आहे. जोस बटलर याने 88 मीटर षटकार मारला होता. श्रेयस अय्यर याने तब्बल 101 मीटर षटकार मारला आहे. श्रेयस अय्यरच्या या षटकाराची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.




