बांदा : गोव्याहून मुंबईच्या दिशेने होणाऱ्या बेकायदा दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुंबई-गोवा महामार्गावर इन्सुली खामदेव नाका येथे सर्वात मोठी कारवाई केली. पथकाने कारवाई करत तब्बल ७१ लाख ५८ हजार रुपये किमतीच्या दारुसह एकूण ८६ लाख ५८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी चालक ज्योतिबा परशुराम गावडे (वय ३०, रा. शिवाजीनगर, बेळगाव) याचेवर बांदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत अटकेची कारवाई करण्यात आली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी गोव्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्या गोवा बनावटीच्या बेकायदा दारू वाहतुकीविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला बेकायदा दारू वाहतुकीची गोपनीय माहिती मिळाल्याने महामार्गावर इन्सुली येथे सापळा रचला होता. गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकला (केए २२ सी ३४१६) तपासणीसाठी थांबविण्यात आले. ट्रक चालकाकडे चौकशी केली असता त्याच्याकडून असंदीग्ध माहिती मिळाली. पथकाला संशय आल्याने ट्रकच्या पाठीमागील हौद्याची पाहणी करण्यात आली.

हौद्यात पाठीमागे वॉल पुट्टीच्या गोण्या भरण्यात आल्या होत्या. त्याच्या मागे गोवा बनावटीच्या विविध ब्रँडची दारू बेकायदा भरण्यात आली होती. पथकाने सदरच्या ट्रक मधील दारूची मोजमाप करण्यासाठी ट्रक बांदा पोलीस ठाण्यात नेला. एकूण ७१ लाख ५८ हजार रुपये किमतीची दारू व १५ लाख रुपये किमतीचा ट्रक असा एकूण ८६ लाख ५८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र घाग, पोलीस अंमलदार गुरुनाथ कोयंडे, प्रकाश कदम, अनुपकुमार खंडे, आशिष गंगावणे, किरण देसाई, आशिष जमादार, चंद्रकांत पालकर, चंद्रहास नार्वेकर, संतोष सावंत यांच्या पथकाने केली.





