रोहा : शशिकांत मोरे
रोहा – कोलाड रस्त्यावर सध्या मोकाट गुरांचा प्रचंड वावर सुरु असल्याने रहदारीला अडथळा ठरणारी हि मोकाट गुरं मात्र अपघाताला कारणीभूत ठरत आहेत.गुरांच्या मालकांनीच बेजबाबदार पणाचा कळस गाठल्यामुळे अनेकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकाना याचा मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्याने या मोकाट गुरांबाबत संबंधितांकडून ठोस उपाययोजना होणे गरजेचे असल्याचे प्रवासी वर्गातून बोलले जात आहे.

राज्य महामार्गाला कोलाड येथे जोडलेला रोहा-कोलाड रस्ता हा वाहतुकीसासाठी अत्यंत महत्वाचा मार्ग आहे.धाटाव परिसरातील औद्योगिक वसाहतीत असलेल्या अनेक कारखान्यात रोजीरोटी साठी कामगार रोह्यातील ग्रामीण भागांतुन कामानिमित्त येत असतात तर शालेय विद्यार्थी सुद्धा सायकलवरून प्रवास करताना दिसतात.त्यातच दुचाकी,चारचाकी वाहनांबरोबर अवजड वाहनांचाही यामध्ये मोठ्या प्रमाणात सामावेश आहे.सतत वर्दळीच्या या रस्त्यावर मात्र दिवसरात्र जागोजागी मोकाट गुरांचा प्रचंड प्रमाणात वावर होत असल्याने रहदारीला अडथळा निर्माण होत आहे.त्यातच या रस्त्यावरील पथदिवे अनेक ठिकाणी बंद अवस्थेत असल्याने व विजेच्या खेळखंडोब्यामुळे रात्री रस्त्यात बसलेली गुरं वाहन चालकांना अपुऱ्या उजेडामुळे नजरेस न आल्यामुळे अपघात घडून अनेकजण जखमी तर काहींना कायमचे अपंगत्व आले असल्याच्या कित्येक घटना घडल्या आहेत.तर मुंबई कडे जाणाऱ्या प्रवाशांना पहाटेच्या रेल्वेने जावे लागत असताना रस्त्यातील या मोकाट गुरांबरोबर मोकाट कुत्र्यांचाही अक्षरशः सामना करावा लागतो.
कोलाड पासून रोह्यापर्यंत प्रत्येक नाक्यावर रस्त्यात एकापाठोपाठ एक असा गुरांचा मोठा कळप असल्याने रहदारीला अडथळा होतोच तर काहीं ठिकाणि वाहतूक कोंडी सुद्धा होताना दिसते.गुरांच्या मालकांच्या बेजबाबदार पणामुळेच रस्त्यावर मोकाट गुरं असल्याने चोरट्याच्या टोल्याही या ठिकाणी सक्रिय झाल्या आहेत.मात्र या रोजच्या समस्येला प्रवासी वर्गाला बळी पडावे लागत असल्यामुळे संबंधितांकडून याबाबत ठोस कारवाई करावी अशी मागणी होत आहे.





