सावंतवाडी : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण मतदार संख्येचा विचार करता भारतीय जनता पक्षाचे तब्बल सहा लाखांपेक्षा अधिक हक्काची मते आहेत. म्हणून मतदारसंघातील सर्वसामान्य भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची इच्छा हीच आहे की, आगामी काळात भारतीय जनता पार्टीचाच खासदार असावा, ही सामान्य कार्यकर्त्यांची इच्छा आम्ही वरिष्ठांकडे कळवली आहे. मात्र वरिष्ठ जो निर्णय घेतील तो शीरसावंद्य ठेवून आम्ही निष्ठेने भारतीय जनता पार्टीचे सैनिक म्हणून काम करू, असे प्रतिपादन कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांनी सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले.

सावंतवाडी येथे भारतीय जनता पार्टी, सिंधुदुर्ग यांच्या वतीने महाविजय संकल्प 2024 अंतर्गत बूथ स्तरीय घर चलो अभियान बैठक संपन्न झाली. यावेळी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे प्रचार प्रमुख तथा माजी आमदार राजन तेली, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब, दोडामार्गचे नगराध्यक्ष चेतन चव्हाण, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, भारतीय जनता पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, जिल्हा बँक संचालक महेश सारंग, संदीप मेस्त्री, राजन म्हापसेकर एकनाथ नाडकर्णी, भाजपा शहराध्यक्ष अजय गोंदावळे, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस प्रथमेश तेली, रवींद्र मडगावकर भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान यावेळी आमदार नितेश राणे पुढे म्हणाले, माजी खासदार निलेश राणे यांना मागील निवडणुकीत ज्या पद्धतीने पावणे तीन लाख मते मिळाली. त्याच पद्धतीने किंबहुना त्यापेक्षा अधिक जोमाने आता आमची तयारी आहे. आता तर संपूर्ण मतदार संघात सहा लाखापेक्षा जास्त मतांची नोंदणी आमच्या पक्षाची असल्यामुळे भारतीय जनता पार्टीचा सामान्य कार्यकर्ता आपला हक्काचा खासदार असावा, अशी आशा बाळगून आहे. हीच भूमिका आमची आहे. तशी आम्ही वरिष्ठांकडे मते नोंदवली आहेत. त्यांचा वरिष्ठ जरूर सकारात्मक पद्धतीने विचार करतील व आमच्या भावनांचा आदर करून पुढचा खासदार हा भारतीय जनता पक्षाचाच निवडून आणतील. त्यासाठी संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी मेहनत घेत आहेत, असे सांगत असतानाच सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून संजू परब व महेश सारंग यांची मेहनत आणि माजी आमदार राजन तेली यांचे मार्गदर्शन यांच्यामुळे भरभक्कम पायाभरणी आमच्या पक्षाची झाली आहे, असेही आमदार राणे म्हणाले.
- सुपर वॉरियर्स ही संकल्पना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडली. ज्याप्रमाणे भारतीय सैनिक देशाच्या सीमेवर लढताना केवळ देशाचा व तिरंग्याचा विचार करतात त्याच प्रमाणे भाजपचे सुपर वॉरियर्स हे भाजपचा झेंडा सर्वत्र फडकवावा व शतप्रतिशत भाजपचा विजय होण्यासाठी काम करीत आहेत. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातही माजी नगराध्यक्ष संजू परब तसेच जिल्हा बँक संचालक महेश सारंग हे विधानसभा मतदारसंघ प्रमुख राजन तेली यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट काम करीत असून हेच रोल मॉडेल घेऊन आम्ही आमच्या मतदारसंघातही काम करणार आहोत, अशा शब्दात त्यांनी संजू परब व महेश सारंग यांच्या कार्याचे कौतुक केले.






