नाशिक- सिन्नर : मराठा समाजाची गेल्या दोन पिढ्यांची आरक्षणाची मागणी आता अंतिम टप्प्यात आली आहे. आता आरक्षण दिल्याशिवाय सरकारची सुटी नाही. आमच्या हक्काचे आम्हाला कसे देत नाही, ते पाहून घेऊ, असा इशारा मनोज जरांगे-पाटील यांनी पांगरी (ता. सिन्नर) आणि नाशिकमधील सभेत दिला.
मराठा आणि कुणबी एकच आहेत, इतर कोणाचाही वाटा आम्ही मागत नाही, गरीब मराठा समाजाला त्यांचे हक्काचे व टिकणारे आरक्षण हवे आहे, त्यासाठीच सरकारला महिनाभर नव्हे, ४० दिवसांची मुदत दिली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मराठा आरक्षणप्रश्नी राज्यव्यापी जनजागृती मोहिमेवर असलेल्या जरांगे-पाटील यांचे रविवारी (ता. ८) नाशिक जिल्ह्यात आगमन झाले. पांगरी (ता. सिन्नर) येथे त्यांची जाहीर सभा झाली. त्यानंतर नाशिककडे येताना नाशिक रोड येथेही मराठा समाजातर्फे त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
नाशिक येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ सुरू असलेल्या साखळी उपोषणाच्या ठिकाणी रात्री उशिरा त्यांचे आगमन झाले. पुष्पवृष्टी करीत त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. त्यांच्या हस्ते मराठा क्रांतीची ज्योत पेटविण्यात आली. त्यानंतर त्यांनी उपस्थित समाजबांधवांना संबोधित केले.
आमचे उपोषण वास्तव मागणीसाठी आहे. महाराष्ट्रातील सबंध मराठा समाज शेती करतो. त्याच्या नोंदी सर्वत्र आहेत. मराठवाड्यात ऊर्दू, फारसी, मोडी अशा विविध भाषांतील कागदपत्रांत या पाच हजार नोंदी आम्ही संकलित केलेल्या आहेत. त्यामुळे उपोषणावेळी चर्चेला आलेल्या शिष्टमंडळाला आम्ही चार दिवसांचा कालावधी देण्याबाबत ठाम होतो. मात्र, सातत्याने टिकणारे व कायद्याच्या कसोटीत बसणारे आरक्षण हवे तर निर्णय घेण्यासाठी एक महिन्याचा कालावधी द्या, असे राज्य सरकारचे प्रतिनिधी मंडळ सांगत होते.
सर्वपक्षीय नेत्यांनी एक महिन्याचा कालावधी देण्याचा ठराव करावा, असा आग्रह धरला. त्यानुसार मंत्रालयात झालेल्या बैठकीत निर्णय होऊन सर्वपक्षीय नेत्यांनी विनंती केल्यावर आम्ही ३० नव्हे, तर ४० दिवसांचा कालावधी सरकारला वाढवून दिला आहे.
मात्र, यापुढे हा कालावधी संपल्यावर मराठा समाज स्वस्थ बसणार नाही, असा इशारा जरांगे-पाटील यांनी दिला.





