सावंतवाडी : विद्यार्थ्यांना संगीत विषयक अभिरुची निर्माण व्हावी व विविध वाद्यवादन कौशल्य आत्मसात व्हावे, या उद्देशाने कलंबिस्त हायस्कूलमध्ये संगीत वाद्य प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आला. यावेळी माडखोल येथील संगीत प्रशिक्षक सुशांत मेस्त्री यांच्याहस्ते शारदामातेला पुष्पहार अर्पण करून या प्रशिक्षण वर्गाचा शुभारंभ करण्यात आला. प्रशालेचे ज्येष्ठ लिपिक विष्णू पास्ते यांनी प्रशिक्षक श्री. मेस्त्री व उपस्थिततांचे स्वागत केले.
हा प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यासाठी पालक – शिक्षक संघाचे माजी सदस्य व पालक संजीव पालकर यांनी विशेष परिश्रम घेतले. प्रशालेतील ३० विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षण वर्गात प्रवेश घेतला असून हार्मोनियम, पखवाज वादनाचे त्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. या प्रशिक्षण वर्गात अन्य शाळेतील विद्यार्थ्यांना सहभागी व्हायचे असल्यास त्यांनी प्रशालेशी संपर्क साधावा, असे आवाहन मुख्याध्यापक अभिजीत जाधव यांनी केले आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रशालेतील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर वालावलकर यांनी केले.





