नाना पटोलेंना धक्का! ; समन्वय समितीसाठी दिलेली नावे वरिष्ठांनी नाकारली, कारण आलं समोर.

75

मुंबई- लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. समन्वय समितीमध्ये प्रत्येक पक्षाच्या तीन नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलेली नावे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी नाकारली आहेत.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाविकास आघाडीच्या समन्वय समितीत दिलेली नावं काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी नाकारली आहेत. काँग्रेसच्या केंद्रीय पातळीवरील वरिष्ठांची परवानगी न घेता पटोले यांनी नाव दिल्याची सूत्रांची माहीती आहे. नाना पटोले यांनी कळवलेली यादी अंतिम नसल्याचं महाविकास आघाडीतील मित्रपक्षांना कळवलं असल्यातं सांगण्यात येतंय. तसेच के सी वेणूगोपाल यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन करून यादीवर केंद्रीय पातळीवरून शिक्कामोर्तब झालं नसल्याचं कळवलं असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी एकत्र लढणार आहे. जागा वाटपाचा प्रश्न आणि इतर मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे. प्रत्येक पक्षाचे तीन नेते समन्वय समितीमध्ये आहेत. नाना पटोले यांनी दिलेली नावे नाकारली गेल्याचे वृत्त असल्याने त्यांच्यासाठी तो धक्का असल्याचं मानलं जातंय.