मुंबईः महादेव बुक अॅप प्रकरणी अनेक बॉलिवूड अभिनेत्यांना ईडीने समन्स दिलेलं आहे. त्यातच आता विनोदी कलाकार कपिल शर्मा, अभिनेत्री हुमा कुरेशी आणि हिना खान यांनी ईडीने समन्स बजावलं आहे. महादेव बुक या अॅपची जाहिरात करणारे कलाकार यांच्या अडचणी वाढल्या आहेत. तसेच महादेव अॅपचा प्रवर्तक सौरभ चंद्राकर याच्या दुबईमध्ये पार पडलेल्या अलिशान लग्न सोहळ्यात सादरीकरण करणाऱ्या सेलिब्रेटिंना आर्थिक मोबदला मिळाल्याचा ईडीला संशय आहे. त्यामुळे कारवाईचा जोर वाढतोय.
आता पुन्हा कपिल शर्मा, हुमा कुरेशी आणि हिना खान यांना ईडीने समन्स बजावल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणी त्यांची चौकशी कधी होणार आणि आणखी कोण सेलिब्रिटी यामध्ये अडकणार, हे येत्या काळात कळेलच.
कपिल शर्मा आणि हुमा कुरेशी यांना ईडीने समन्स दिल्याची माहिती ‘एएनआय’ने ईडीच्या सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. अभिनेता रणबीर कपूरनंतर अनेक प्रसिद्ध बॉलिवूड कलाकार ईडीच्या रडारवर आहेत. अनेकांनी महादेव बुक App ची जाहिरात केल्याचं समोर येत आहे. रणबीर कपूर याच्या बरोबरच अमिषा पटेल, श्रद्धा कपूर, सोनाक्षी सिन्हा, इम्रान हाश्मी, बोमन इराणी, कॉमेडियन भारती सिंग आणि इतर गायकांचा यात समावेश आहे.





