संजय राऊत यांचे लहान बंधूही अडचणीत.! ; संदीप राऊत यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी.

47

मुंबई : मुंबई महापालिकेच्या कथित खिचडी घोटाळा प्रकरणात खासदार संजय राऊत यांचे भाऊ संदीप राजाराम राऊत यांची चौकशी होणार आहे. आर्थिक गुन्हे शाखेने संदीप राऊत यांना नोटीस देऊन शुक्रवारी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. खिचडी घोटाळा प्रकरणातील पैसे संदीप राऊत यांनासुद्धा मिळायचे असा आरोप करण्यात आला आहे. संदीप राऊत हे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे धाकटे बंधू आहेत. त्यांना शुक्रवारी सकाळी 11 वाजता मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. खिचडी घोटाळा प्रकरणात या अगोदर उद्धव ठाकरे गटातील अमोल कीर्तिकर आणि आदित्य ठाकरे यांचे निकटवर्ती सुरज चव्हाण यांचीसुद्धा चौकशी झाली होती.

 खिचडी घोटाळा नेमका आहे तरी काय? 

मुंबई महानगरपालिकेचा कोरोना काळातील बॉडी बॅग घोटाळा चर्चेत असतानाच आता आणखी एका घोटाळ्या प्रकरणी कारवाई सुरू झाली आहे. मुंबई महानगरपालिकेचा 100 कोटींचा कोविड घोटाळा आता समोर आला आहे. गरिब मायग्रेन कामगारांसाठी, ज्यांचे स्वत:चे मुंबईत घर नाही त्यांना लॉकडाऊन काळात जेवणाची व्यवस्था करण्याचा निर्णय तत्कालीन सरकारनं घेतला होता. भारत सरकारचंही त्याला समर्थन होतं. या मायग्रेन कामगारांना खिचडी देण्याचं कॉन्ट्रॅक्ट 52 कंपन्यांना मुंबई महानगरपालिकेनं दिलं होतं. सुरुवातीच्या 4 महिन्यात 4 कोटी खिचडी पॅकेट वाटण्यात आले, असं मुंबई महानगरपालिकेचे म्हणणं आहे. पण यामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याचीच चौकशी सुरू आहे.

खिचडी घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल 

मुंबई महानगरपालिकेतील कथित खिचडी घोटाळा प्रकरणात मुंबई आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे. कथित बॉडी बॅग प्रकरणानंतर आता खिचडी घोटाळ्यातही आर्थिक गुन्हे शाखेनं गुन्हा दाखल केला आहे. आर्थिक गुन्हे शाखेनं संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर, सुनिल बाळा कदम, तत्कालीन सहआयुक्त, नियोजन, बीएमसी, सह्याद्री रिफ्रेशमेंटचे राजीव साळुंखे, फोर्सवन मल्टी सर्विसेसचे भागीदार आणि कर्मचारी, स्नेहा कॅटरर्सचे भागीदार, इतर बीएमसी अधिकारी आणि इतर संबंधितांविरोधात गुन्हा दाखल केला.

या प्रकरणी आता संजय राऊत यांचे धाकटे भाऊ संदीप राऊत यांचीही चौकशी होणार आहे.