सावंतवाडी : शहरातील झाड अंगावर पडून मयत झालेल्या दोन्ही युवकांच्या वारसांना प्रत्येकी रु. 50 लाख मात्र देण्यासाठी शासनाने तातडीने प्रयत्न करावा, अशी नम्र विनंती आहे. सदर बाबत आपलेकडून येत्या पंधरा दिवसात सकारात्मक कार्यवाही न झालेस शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आम्हास नाईलाजास्तव सोमवार दि. 23/10/2023 रोजी आपले कार्यालयावर ग्रामस्थांचा भव्य आक्रोश मोर्चा आणावा लागेल, याची कृपया नोंद घ्यावी असा इशारा सामाजिक कार्यकर्ते मंगेश तळवणेकर यांनी तहसीलदार सावंतवाडी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
आपल्या निवेदनात मंगेश तळवणेकर नमूद करतात – सावंतवाडी शहरात 8 दिवसांपूर्वी झालेल्या दुर्दैवी घटनेमुळे संपुर्ण सिंधुदुर्ग जिल्हा हादरुन गेला होता. शहरातील धोकादायक झाडे तोडण्याचे नियोजन व सर्व्हे करण्यासाठी आपणाला यापूर्वी पत्र दिले होते. त्याचे काय झाले हे आम्हाला काहीच माहीत नाही. गेल्या आठ दिवसात आम्हाला आपल्याकडून काहीच कळविण्यात येत नाही. आमचे पत्र मिळाल्या पासून आठ दिवसात आपण सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण, वनविभाग, महसुल विभाग व नगरपरिषद यांच्या संबंधित अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करणे आवश्यक होते. परंतु आपलेकडून तशी कोणतीही कार्यवाही झालेली नाही.
सदरचे दोन्ही तरुण हे ऐन उमेदीच्या काळात या दुर्दैवी अपघातात मृत झालेले असून, त्यांच्यावर त्यांच्या वयोवृद्ध आईवडीलांची व लहान भावंडांची सर्व जबाबदारी होती. शासनाने या तरुण मुलांच्या वारसांना रु.5 लाखांची मदत जाहीर करुन एक प्रकारे थट्टाच केलेली आहे. सदरच्या वस्तुस्थितीची गंभीर दखल घेऊन, सावंतवाडी शहरातील रस्त्यावरील व सार्वजनिक ठिकाणची सदरची धोकादायक झाडे तोडणे व दोन्ही मृतांच्या वारसांना प्रत्येकी रु.50 लाख मात्र देण्यासाठी तातडीने प्रयत्न करावा, अशी नम्र विनंती आहे. सदर बाबत आपलेकडून येत्या पंधरा दिवसात सकारात्मक कार्यवाही न झालेस शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आम्हास नाईलाजास्तव सोमवार दि.23/10/2023 रोजी आपले कार्यालयावर ग्रामस्थांचा भव्य आक्रोश मोर्चा आणावा लागेल याची कृपया नोंद घ्यावी असा इशारा मंगेश तळवणेकर यांनी दिलाय.





