…अन्यथा उभारू जनआंदोलन..! ; ‘सामाजिक बांधिलकी’चा निवेदनाद्वारे प्रशासनाला कडक इशारा.

47

सावंतवाडी : ‘सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान’च्या वतीने शहरातील रस्त्यांवर असलेल्या व जीर्ण झालेल्या वृक्षांमुळे घडणाऱ्या आपत्ती विषयी जागृती करणारी निवेदने संबंधीत संस्था, शासकीय कार्यालये, नगरपरिषद या ठिकाणी पावसा अगोदर देण्यात आलेली होती. परंतु त्या निवेदनांची दखल न घेतल्या कारणाने तीन दिवसांपूर्वी मोठा अपघात घडला. म्हणून प्रशासनाला पुन्हा जागे करण्यासाठी आज सदर निवेदने देण्याची आज गरज भासली. याचे कारण म्हणजे सावंतवाडीच्या राजवाडा परिसरातील घडलेल्या विपरीत घटनेमुळे. या घटनेत भला मोठा वृक्ष अंगावर पडून दोन तरुणांचा अपघाती मृत्यू झाला. यावेळी सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते रवी जाधव, संजय पेडणेकर, शाम हळदणकर व शैलेश नाईक घटनास्थळी यंत्रसामुग्री घेऊन दाखल झाले व कटरच्या साह्याने झाड कापून प्रेत बाहेर काढण्यात आले. नागरिकांना रस्ता मोकळा करून देण्यात आला. सावंतवाडीतील सुजाण नागरिकांच्या मदत कार्याने त्या तरुणांना वाचवण्याचे शर्यतीचे प्रयत्न झाले पण दुर्दैव त्यांचा प्राण वाचू शकला नाही. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाची संरक्षण भिंत कोसळून सदर प्रकारची घटना पुन्हा घडू नये, म्हणून या घटनेचा आधार घेऊन दिनांक 27 सप्टेंबर 23 सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय विभागाच्या समोर असलेल्या धोकादायक व जीर्ण झालेल्या 15 फुटी उंच भिंतीपासून होणाऱ्या संभाव्य दुर्घटनेकडे लक्ष वेधण्यासाठी दुबार निवेदन देण्यासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय, तहसीलदार ऑफिस, प्रांत ऑफिस यांच्याजवळ निवेदने दिली.

त्याचप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभाग निर्माण भुवन कार्यकारी अभियंता श्री. महेंद्र किणी यांच्या कार्यालयात सामाजिक बांधिलकीच्या कार्यकर्त्यांनी निवेदन दिले असता त्यावेळी सदर निवेदन वाचून हा भाग आमच्या कार्यक्षेत्रामध्ये येत नाही, आम्ही फक्त केअर टेकर भूमिकेत असल्याचे सांगितले तसेच त्या रात्री सावंतवाडी परिसरात अभियंताच्या कार्यालय पासून हाकेच्या अंतरावर घडलेल्या दुर्दैवी घटनेचा उल्लेख केला असता कार्यकारी अभियंता श्री. किणी यांनी या घटनेबाबत आपल्याला काहीच माहित नाही असे सांगितले. त्यावेळी दुपारचे ठीक 1 वाजले होते. तसेच सदर बाबी आरोग्य विभागाच्या अखत्यारीतील असल्याचे सांगितले. निवेदन स्वीकारताना फोटो घेण्यासाठी विनंती केली असता त्यांनी सावंतवाडीकर फोटो काढण्यासाठी अतिउत्साही असल्याचे उद्धट विधान केले. त्यावेळीच्या नाजूक परिस्थितीमध्ये अशा प्रकारचे विधान करणे एका जबाबदार शासकीय अधिकाऱ्याला शोभत नव्हते. तसेच सामाजिक बांधिलकीच्या कार्यकर्त्यांनी दिलेले निवेदन सदर अधिकाऱ्यांने बसून स्वीकारले. शहरांमध्ये निस्वार्थ व प्रामाणिकपणे सेवाभावी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा हा अपमानच होता. परंतु आम्हाला अपमानाचे काहीच लागत नाही, कारण सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान ही संस्था नि:स्वार्थ व निस्पृहपणे कोणताही विचार न करता रात्री -अपरात्री संकटकाळी धावून जाणारी व मदत कार्य करणारी एक अग्रेसर रजिस्टर संस्था आहे. आपत्कालीन काळामध्ये या संस्थेने रस्त्यावर व हवेवर पडलेली मोठमोठी झाडे रात्री- अपरात्री व कुठच्याही वेळेत सामाजिक बांधिलकीच्या आपत्कालीन टीम पोचून स्वखर्चाने तोडून रस्ते वाहतुकीस मोकळे करून सार्वजनिक बांधकाम विभागाला मोठे सहकार्य केले होते, याचा या अधिकाऱ्यांना विसर पडला आहे.

तसेच कार्यकारी अभियंता यांच्या सोबत निवेदन देताना फोटो काढण्यासाठीची सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान सिंधुदुर्ग अस्तित्वात आलेली नसून जी निवेदने दिली जातात त्याचा पुरावा म्हणून सदर फोटोंची विनंती केली होती. जेणेकरून संस्थेच्या दप्तरी त्याची नोंद फोटोसहीत असावी, हा त्यामागचा उद्देश होता. परंतु या बाबतीतील गांभीर्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांने तमाम सावंतवाडीकरांच्या भावनेची खिल्ली उडवणारे विधान केले आहे. या त्यांच्या विधानाचा सामाजिक बांधिलकीचे प्रतिष्ठानचे कार्यकर्ते रवी जाधव, संजय पेडणेकर, प्रा. शैलेश नाईक, प्रा. सतीश बागवे, समीरा खलील, हेलन निबरे, श्याम हळदणकर, शेखर सुभेदार, अशोक पेडणेकर, शरद पेडणेकर, प्रा. प्रसाद कोदे यांच्यावतीने वतीने जाहीर निषेध करण्यात येत आहे. तसेच सावंतवाडी बचाव यासंदर्भात एक चळवळ उभी करण्यात येणार आहे व अशा दुर्दैवी दुर्घटना पुन्हा घडू नये, तसेच धोकादायक घटकांवर शासनाचे लक्ष वेधून त्यावर योग्य कारवाई वेळेत न झाल्यास मोठा जनसमुदाय व उभा करून शासनाच्या विरोधात आंदोलन उभा करण्यात येईल, असा इशारा सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून देण्यात आला आहे.