मुंबई : १६ आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण अनेक दिवसांपासून सुरु आहे. यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुनावणी घेण्यात कोणतीही दिरंगाई होणार नाही, असं आश्वासन दिलं होतं. मात्र अजुन त्यावर निर्णय लागलेला नाही. त्यातच आज उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नार्वेकरांवर जोरदार टीका केली आहे. संजय राऊत म्हणाले की, घाना या शहरात देखील लोकशाही अस्थिर असते. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर तिथे लोकशाहीवर प्रवचन द्यायला जात आहेत. महाराष्ट्रामध्ये लोकशाही घाण्याला जुंपून जात आहात ही लाजिरवाणी गोष्ट आहे. तारखांवर तारखा देऊन घटनाबाह्य सरकार चालवत असल्याचा टोला त्यांनी लगावला.
दरम्यान आठ दिवसात निकाल लावा असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. निकालाला उशीर करायचा, म्हणुन ते घानाला जात आहेत. ही आपल्या देशातील लोकशाहीची हत्या, असल्याची टीकाही राऊत यांनी केली. मुंबईत मराठी माणसाला घर न देण्याच्या घटनेवर राऊत म्हणाले की, मराठी माणसाच्या अस्मितेसाठी लढणाऱ्यांची ताकद कमी व्हावी यासाठी एकनाथ शिंदे यांना हाताशी धरून मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खुपसला आहे.









