मुंबई : शिवसेना आमदारांच्या अपात्रतेबाबतच्या सुनावणीबाबत मोठी माहिती समोर आली आहे. शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या सुनावणीचे वेळापत्रक ठरल्याची माहिती समोर आली आहे. 13 ऑक्टोबरला शिवसेनेच्या आमदारांच्या सर्व याचिका एकत्र करायच्या कि नाही, यावर सुनावणी पार पडणार आहे. अपात्रतेची सुनावणी नोव्हेंबरपर्यंत चालणार असून सर्व याचिकांवरील सुनावण्यात एकत्रित घ्यायच्या की नाही, याबाबत 20 ऑक्टोबरला मोठा निर्णय होण्याची शक्यता आता वर्तण्यात येत आहे.
13 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर दरम्यान कागदपत्रांची तपासणी होणार आहे, यानंतर 23 नोव्हेंबरदरम्यान युक्तीवाद करण्यात येईल, त्याचबरोबर 23 नोव्हेंबरनंतर दोन आठवड्यात अंतिम सुनावणी होईल, अशी माहिती समोर आली आहे.सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढल्यानंतर आणि नाराजी व्यक्त केल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी 25 सप्टेंबर रोजी आमदार अपात्रतेची दुसरी सुनावणी घेतली होती.
दरम्यान शिवसेना ठाकरे गटाकडून सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी घ्या, अशी मागणी करण्यात आली आहे. तर आमदारांची सुनावणी वेगवेगळी घेण्यात यावी, अशी मागणी शिंदे गटाकडून करण्यात आलेली आहे.
दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुनावणीचे वेळापत्रक निश्चित केल्याची माहिती समोर आली आहे. आमदार अपात्रतेची सुनावणी नोव्हेंबरपर्यंत चालणार असल्याची माहिती समोर येत आहे. आमदार अपात्र प्रकरणाला आता वेग आला असून लवकरच निर्णय लागण्याची शक्यता आहे. यासंबधीचे वृत्त सुत्रांनी दिले आहे.









