पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. अशातच आता आजही अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. आज मुंबई आणि पुण्यालाही यलो अलर्ट देण्यात आला असून अनेक भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याचबरोबर विदर्भातील काही जिल्ह्यांत देखील आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. पुण्यात आज आणि उद्या (मंगळवार, बुधवार) मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली असून सोमवारी (ता. २५) मॉन्सूनने नैर्ऋत्य राजस्थानमधून माघार घेतल्याचे हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आले. यंदाही मॉन्सूनचा परतीचा प्रवास उशिराने सुरू झाला असून, दीर्घकालीन सर्वसाधारण वेळेच्या आठ दिवस उशिराने मॉन्सूनने राजस्थानातून काढता पाय घेतला आहे. गतवर्षी २० सप्टेंबर रोजी मॉन्सून वारे राजस्थानातून माघारी फिरले होते.
वायव्य भारतात ८५० हेप्टापास्कल उंचीवर घड्याळाच्या काट्याच्या दिशेने केंद्रभागातून बाहेरच्या बाजूला वारे वाहणारे क्षेत्र (ॲण्टी सायक्लोन) तयार झाले आहे. नैर्ऋत्य राजस्थानमध्ये गेल्या पाच दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे, तसेच या भागात आर्द्रतेची टक्केवारी कमी होऊन हवामान कोरडे झाले आहे. या पूरक स्थितीमुळे नैर्ऋत्य राजस्थानमधून मॉन्सूनने माघार घेतल्याचे जाहीर करण्यात आले आहे. नौखरा, जोधपूर, बारमेरपर्यंतच्या भागातून मॉन्सून परतल्याने हवामान विभागाने म्हटले आहे. मॉन्सून आगमन आणि परतीच्या दीर्घकालीन सर्वसाधारण तारखांचे सुधारित वेळापत्रकानुसार १७ सप्टेंबर ही मॉन्सूनच्या राजस्थानातून परतीचा प्रवास सुरू करण्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे. यंदाही तब्बल आठ दिवसाने (ता. २५) मॉन्सूनने राजस्थानातून माघारीस सुरुवात केली आहे. दोन महिने आणि २३ दिवस राजस्थानमध्ये मुक्काम केला.
कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता –
नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) नैर्ऋत्य राजस्थानातून माघार घेतली असून राज्यात पावसाला पोषक हवामान आहे. आज (ता. २६) विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार वारे, विजांसह पावसाचा इशारा (यलो अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. परतीचा प्रवास सुरू झाल्याने मॉन्सूनचा आस निवळून गेला आहे. आग्नेय उत्तर प्रदेश आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत असून आसामपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे.









