आदित्य ठाकरे खूपच लहान, त्यांच्याविरोधात बोललो तर ठाकरेंना परवडणार नाही.! ; मंत्री केसरकरांचा स्पष्ट इशारा.

52

सावंतवाडी : माझ्या मतदार संघात येऊन माझ्यावर बोलणारे आदित्य ठाकरे माझ्यापेक्षा खूप लहान आहेत. त्यामुळे त्यांनी विरोधात बोलताना मर्यादा पाळाव्यात. मी त्यांच्या मतदार संघात जाऊन बोललो तर त्यांना परवडणार नाही, असा इशारा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी श्री. ठाकरे यांना दिला.

दरम्यान, महिला विधेयक मंजूर झाले असले तरी कोणाचे नुकसान होणार नाही. सभागृहातील काही जागा वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे महिलांची संख्या वाढली तरी ज्या चांगल्या व्यक्ती आहेत त्यांना निश्चितच स्थान मिळणार आहे, असे त्यांनी सांगितले.

शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी सावंतवाडी दौऱ्यात केसरकर यांच्यावर टीका केली होती. त्यांच्याबद्दल काय बोलणार? ते खोके सरकारमधील आहेत, असा आरोप केला होता. याबाबत श्री. केसरकर यांनी काल उशिरा प्रतिक्रिया दिली. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, “या ठिकाणी माझ्याच मतदार संघात येऊन आदित्य ठाकरे माझ्या विरोधात बोलत असतील तर ते मी सहन करणार नाही. ते माझ्या पेक्षा लहान आहेत. त्यामुळे त्यांनी माझ्याविरोधात बोलताना मर्यादा सांभाळल्या पाहिजेत. आजपर्यंत मी ठाकरे कुटुंबियांच्या विरोधात बोललो नाही आणि त्यांनी तशीच टीका सुरू ठेवली तर मी त्यांच्या मतदार संघात जाऊन त्यांच्याविरोधात अनेक काही गोष्टी बोलू शकतो; मात्र त्यावेळी ते ठाकरेंना परवडणार नाही.”

यावेळी महिला विधेयकाच्या बाबत त्यांना विचारले असता केसरकर म्हणाले, “या विधेयकामुळे नारीशक्तीचा खऱ्याअर्थाने विजय झाला आहे. विधेयक मंजूर झाल्याने याचा फायदा आता महिलांना होणार आहे; मात्र सद्यस्थिती लक्षात घेता विरोधकांनी एकीकडे श्रेय घेण्यास सुरवात केली आहे, तर दुसरीकडे जागा कमी होणार आहे, अशी ओरड सुरू केली आहे; मात्र या निर्णयामुळे जागा वाढणार आहे. त्यामुळे ज्यांनी सभागृहात चांगले काम केले, त्यांना निश्चितच पुन्हा सभागृहात येण्याची संधी मिळणार आहे, असेही त्यांनी सांगितले.