इंटरनॅशनल स्पेस स्टेशन पृथ्वीवर पाडणार.! ; अमेरिकेकडून तयारी सुरू, काय आहे नासाचा प्लॅन?

52

बंगळुरू : पृथ्वीभोवती अंतराळात फिरत असणारी प्रयोगशाळा, म्हणजेच आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक हे लवकरच पृथ्वीवर पाडण्यात येणार आहे. या दशकाच्या शेवटी अमेरिका ही कारवाई करणार आहे. यासाठी तयारी सुरू करण्यात आली आहे. अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाने यासाठी US डीऑर्बिट व्हेईकल तयार करण्यासाठी प्रपोजल मांडलं आहे. हे USDV यान ISS ला अलगदपणे आपल्या कक्षेतून बाहेर काढेल, आणि पृथ्वीवर अशा ठिकाणी पाडेल, जिथे मानवी वस्ती नाही.

काय आहे ISS?

अमेरिका (NASA), रशिया (Roscosmos), युरोपियन युनियन (ESA), जपान (JAXA) आणि कॅनडा (CSA) या सर्वांनी मिळून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाची स्थापना केली होती. 1998 सालापासून हे स्पेस स्टेशन कार्यरत आहे. याठिकाणी विविध देशांचे अंतराळवीर एकत्र येऊन संशोधन करतात.

हे स्पेस स्टेशन पृथ्वीपासून सुमारे 400 किलोमीटर उंचीवर असणाऱ्या कक्षेत प्रस्थापित करण्यात आलं आहे. ते पृथ्वीभोवती फिरून, पृथ्वीचं निरीक्षण देखील करतं. याठिकाणी एका वेळी सहा-सात अंतराळवीर असतातच.

कशामुळे पाडणार?

जेव्हा या स्पेस स्टेशनची स्थापना करण्यात आली होती, तेव्हाच याचं आयुष्य 2030 सालापर्यंत असेल हे निश्चित करण्यात आलं होतं. रशियाने 2028 पर्यंत यात सहभागी राहणार असल्याचं म्हटलं आहे. रिटायर झाल्यानंतर हे सर्व देश मिळून सुरक्षितपणे ISS ला डीऑर्बिट करतील.

हे स्पेस स्टेशन आपल्या कक्षेतून बाहेर काढून, ते सुरक्षितपणे पृथ्वीवर पाडण्यासाठी मोठ्या क्षमतेचं दमदार यान गरजेचं असणार आहे. अशा यानाच्या निर्मितीसाठी बरीच वर्षं लागू शकतात. यामुळेच नासाने यासाठी आतापासून तयारी सुरू केली आहे.