माझ्या बँक खात्यात फक्त ९०० युरो..! ; भारताचा अव्वल टेनिसपटू केंद्र सरकारवर का आहे नाराज?

31

नवी दिल्ली : भारताचा अव्वल टेनिसपटू सुमित नागलची आर्थिक परिस्थीत फार बिकट झाली आहे. त्याने आपल्या आर्थिक परिस्थितीची जाणीव सर्वांना व्हावी यासाठी आपल्या बँकेत किती रक्कम शिल्लक राहिली आहे हे जाहीर करून टाकले. त्याच्या बँक खात्यात 900 युरोज म्हणजे एक लाखापेक्षाही कमी रक्कम शिल्लक राहिली आहे.

सुमित नागल गेल्या काही वर्षापासून जर्मनी येथील नानसेल टेनिस अकॅडेमीत सराव करत आहे. मात्र तेथे सराव करणं त्याच्या दृष्टीने खूपच खर्चिक आणि तोट्याचा व्यवहार ठरत आहे.

एशियन गेम्स खेळण्यासाठी सज्ज झालेल्या झालेल्या नागलने पीटीआयशी बोलताना सांगितले की, ‘माझी सर्व प्राईज मनी एटीपी टूर्स खेळण्यासाठी गुंतवण्यात आली आहे. माझ्याकडे वर्षाच्या सुरूवातीला जेवढी रक्कम होती तेवढीच रक्कम शिल्लक राहिली आहे. माझ्याकडे जवळपास 900 युरो (साधारणपणे 80,000 रूपये) शिल्लक आहेत.’

‘मला महा टेनिस फाउंडेशनच्या प्रशांत सुतार यांच्याकडून थोडी मदत मिळते. याचबरोबर मला आयओसीएल कडून देखील पगार मिळतो. मात्र माझ्याकडे मोठा स्पॉन्सर नाही.’

नागलने या वर्षी 24 स्पर्धा खेळल्या आहेत. त्यात त्याने जवळपास 65 लाख रूपये कमवले. त्याची युएस ओपनमधू सर्वाधिक कमाई झाली. तो युएस ओपनच्या पात्रता फेरीत पहिल्या राऊंडमध्ये पराभूत झाला. तरी त्याला 22000 युएस डॉलर (जवळपास 18 लाख रूपये) मिळाले.

नागल म्हणतो, ‘मी जे काही कमवले ते सर्व ट्रेनिंगमध्येच गुंतवले. ज्यावेळी मी एका कोचसोबत वर्षभर ट्रॅव्हल करत असतो त्यावेळी मला जवळपास 80 लाख ते 1 कोटी रूपयांपर्यंत खर्च येतो. यात फिजिओचा समावेश नसतो. जे काही मी कमावलं आहे ते सर्व मी माझ्या ट्रेनिंगमध्ये गुंतवले आहे.

सुमित नागलने केंद्र सरकारवरही साधला निशाणा

नागल पुढे म्हणाला की, ‘मला असं वाटतंय की मी गेल्या काही वर्षापासून भारताचा क्रमांक एकचा टेनिसपटू असूनही मला फार कमी पाठिंबा मिळतोय. भारताचा मी एकमेव खेळाडू आहे जो ग्रँडस्लॅमसाठी पात्र होतोय. गेल्या काही वर्षात ऑलिम्पिकमध्ये टेनिस सामना जिंकणारा मी एकमेव खेळाडू आहे. तरी देखील सरकारने माझा समावेश TOPS स्कीममध्ये केलेला नाही.’

‘मला वाटते की ज्यावेळी मला दुखापत झाली आणि माझे रँकिंग खाली आले तेव्हापासून मला कोणीही मदत करू इच्छित नाही. मी जे काही करतोय ते पुरेसं नाही. भारतात आर्थिक मदत मिळणं खूप कठिण आहे. मला माहिती नाही की मी काय करून मी आता हताश झालो आहे.’

भारतीय टेनिसपटूंनी व्यावसायिक स्तरावर एकेरीमध्ये खेळणे खरंच व्यावहारिक पर्याय आहे का असा प्रश्न विचारल्यानंतर नागल म्हणाला, ‘माझी बचत अशी काही नाही. मी जेवढं कमवतोय तेवढा खर्चही होतोय. चांगलं आयुष्य जगतोय असं मी म्हणू शकत नाही.’

‘मला आता काम करण्याची गरज नाही असं मी म्हणू शकत नाही. मी गेल्या दोन वर्षापासून काहीही कमवून ठेवलं नाही. त्यामुळं मी निदान तोट्यात नाही, माला अकॅडमी सोडून स्वतःचं स्वतः पाहावं लागत नाही यातच आनंद आहे.’