सावंतवाडी : सावंतवाडी शहरातील गणेशोत्सवानिमित्त लावलेल्या विविध ठिकाणच्या शुभेच्छा बॅनरांची पावसाने दुर्दशा केली एएएचई. याबाबत सामाजिक बांधिलकी संघटनेने आवाहन केले असून ते म्हणतात, सावंतवाडी शहरातील सर्व बॅनर धारकांना सर्वप्रथम गणेश उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपणास एक कळकळीची विनंती आहे, शहरांमध्ये आपण लावलेले गणेश उत्सवाचे मोठमोठे बॅनर या दोन दिवस पडत असलेल्या वादळी पावसामुळे रस्त्यावर कोसळले आहेत.


त्यामुळे दोन दुर्घटना देखील घडलेल्या आहेत तसेच बॅनरवर आपले व सर्वांच्या लाडक्या बाप्पांचा फोटो असल्याने आपला व बाप्पांचाही अपमान होत आहे. तरी रस्त्यावर पडलेले काही बॅनर सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून नीट ठेवण्यात आलेले आहेत. तरी रस्त्यावर अजून विविध ठिकाणी बॅनर पडलेले व लटकत असलेले दिसताहेत, तरी आपापले बॅनर आपण व्यवस्थित करून लावावेत, ही नम्र विनंती तसदीबद्दल क्षमा असावी, असे विनम्र आवाहन सामाजिक बांधिलकी सावंतवाडी संघटनेच्या माध्यमातून रवी जाधव यांनी केले आहे.










