भारताची मोठी कारवाई.! ; टॉपच्या कॅनेडियन अधिकाऱ्याची केली हकालपट्टी.

38

नवी दिल्ली : कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी खलिस्तानवादी दहशतवादी हरदीप सिंह निज्जर याच्या हत्या प्रकरणात भारतावर केलेल्या आरोपांमुळं खळबळ उडाली असून भारतानंही ते गांभीर्यानं घेतलं आहे. कॅनडानं भारतीय उच्चाधिकाऱ्याला हटवल्यानंतर आता भारतानंही या प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. त्यानुसार भारतातील कॅनडाच्या उच्चाधिकाऱ्याची हाकालपट्टी करण्यात आली आहे.

कॅनडाच्या उच्चायुक्तांना समन्स..

भारतातील कॅनडाच्या उच्चायुक्तांना आज भारतानं समन्स पाठवलं आणि भारतातील कॅनडाच्या वरिष्ठ उच्चाधिकाऱ्याची भारतातून हाकालपट्टी केल्याची माहिती देण्यात आली. त्याचबरोबर हाकालपट्टी केलेल्या अधिकाऱ्याला पाच दिवसात भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रसिद्धी पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे.

भारतविरोधी कारवायांना पाठिंबा..

भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये कॅनडाच्या अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप आणि भारतविरोधी कारवायांना पाठिंबा असल्याबद्दल भारत सरकारनं चिंताही या प्रसिद्धी पत्रकातून व्यक्त करण्यात आली आहे.

कॅनडाच्या पंतप्रधानांनी काय केलाय आरोप?

कॅनडाची राजधानी ओटावा इथल्या त्यांच्या ससंदेत अर्थात हाऊस ऑफ कॉमन्समध्ये बोलताना ट्रूडो यांनी भारतावर गंभीर आरोप केले. त्यांनी म्हटलं की, कॅनडाच्या सुरक्षा एजन्सी कॅनेडियन नागरिक हरदीप सिंग निज्जर यांच्या हत्येतील भारताच्या संभाव्य सहभागाच्या आरोपांची चौकशी करत आहेत. पण या कार्यात भारतीय अधिकाऱ्यांकडून अडथळा आणला जात आहे.

एखाद्या कॅनडाच्या नागरिकाच्या कॅनडाच्याच भूमीवर झालेल्या हत्येमध्ये जर इतर कोणत्याही देशाचा किंवा परदेशी सरकारचा सहभाग असेल तर तो खपवून घेतला जाणार नाही. हा प्रकार आमच्या सार्वभौमत्वाचं उल्लंघन आहे, जे पूर्णपणे अस्वीकार्य आहे. हे मूलभूत नियमांच्या विरोधात आहे, असंही ट्रुडो यांनी म्हटलं होतं.