वॉशिंग्टन- अमेरिकेमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मासा खाल्ल्याने महिलेला तिचे दोन्ही हात आणि पाय गमवावे लागले आहेत. कॅलिफॉर्नियातील ही घटना असून एक ४० वर्षीय महिलेने दूषित तिलापिया मासा खाल्यानंतर तिला हॉस्पिटलमध्ये भरती करावं लागलं. त्यानंतर तिचा जीव वाचवण्यासाठी तिचे दोन्ही हात आणि पाय कापावे लागले आहेत.
लॉरा बाराजस यांनी दूषित तिलापिया मासा खाल्ला होता. माहितीनुसार, मासा विब्रियो वुल्निफिकस या जिवाणूने दुषित होता. त्यानंतर लॉराने तो मासा खाल्ला होता. महिलेच्या मित्राने दिलेल्या माहितीनुसार, जीवाणू संक्रमणमुळे लॉराची ही स्थिती झाली आहे. दाव्यानुसार, महिलेने अर्धा शिजलेला तिलापिया मासा खाल्ला आहे. त्यामुळे जिवाणूचा तिच्यात प्रवेश झाला.
न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, ४० वर्षीय लॉराला एका महिन्यापूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर गुरुवारी तिचे ऑपरेशन करण्यात आले. ऑपरेशन केलं नसतं तर महिलेला आपला जीव गमवावा लागला असता. महिलेचे हात आणि पाय कापून तिचा जीव वाचवण्यात आला आहे.
रोग नियंत्रण आणि प्रतिबंध संस्थेने एका धोकादायक जिवाणूच्या संक्रमणाबाबत इशारा जारी केला आहे. कच्चा किंवा अर्धवट शिजवलेला मासा खाल्यामुळे या जिवाणूचे संक्रमण होते. त्यामुळे महिलेला याच जिवाणूची लागण झाल्याचे बोलले जाते. महिलेचा जवळपास जीव गेलाच होता. महिला कोमामध्ये गेली होती, तसेच तिला ऑक्सिजनवर ठेवण्यात आले होते. माहितीनुसार, महिलेची किडनी निष्क्रिय झाली होती. तिचे पाय, हात आणि ओठ काळे पडले होते. महिलेने स्थानिक बाजारातून मासा खरेदी केला होता. त्यानंतर घरी आणून तो शिजवला होता. जिवघेणा जिवाणू समुद्री जीव आणि समुद्राच्या पाण्यामध्ये आढळून येतो.









