गोगटे जोगळेकर महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा उत्साहात

रत्नागिरी:  गोगटे जोगळेकर महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त आयोजित कार्यक्रमात रत्नागिरीतील प्रसिद्ध लेखिका रश्मी कशेळकर यांचे चर्चासत्र संपन्न झाले. गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी येथे मराठी विभागांतर्गत मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘स्त्री भूमी आणि भाषा’ या विशेष कार्यक्रमात मंगळवार 24 जानेवारी रोजी रश्मी कशेळकर या ललित लेखिका संवादक म्हणून लाभल्या.

रश्मी कशेळकर या रत्नागिरीतील प्रसिद्ध लेखिका असून त्यांचे ‘भुईरिंगण’ व ‘भुयपर्मळ’ हे दोन ललित लेख संग्रह प्रकाशित झाले आहेत; तसेच त्यांचे विविध लेख दिवाळी अंकांतून दरवर्षी प्रकाशित होत असतात. त्यांच्या लेखनाबद्दल त्यांना अनेक पुरस्कारही मिळालेले आहेत.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला ‘शांतता! मराठीचे कोर्ट चालू आहे’ ही शॉर्ट फिल्म उपस्थितांना दाखवण्यात आली. त्यानंतर मूळच्या देवगडच्या असलेल्या या लेखिकेने आपल्या लेखन प्रवासातील अनुभव, त्यासाठी केलेला प्रवास यांबद्दल विद्यार्थ्यांशी गप्पा मारल्या. मालवणी भाषेचा अंतर्भाव असलेल्या त्यांच्या पुस्तकांतील ललित लेखांच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी यावेळी त्यांना प्रश्नही विचारले आणि त्यांना उत्तम प्रतिसादही मिळाला.

कार्यक्रमाच्या समारोपात कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी यांनी आपल्या कोकणी भाषेचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून देताना मराठी भाषेकडे एक उत्तम संधी म्हणून पाहणे कशाप्रकारे शक्य आहे, याबद्दल मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमाला मराठी विभागाचे प्रमुख प्रा. गोपाळेसर, डॉ. निधी पटवर्धन, दांडेकरसर तसेच इतर सहकारी प्राध्यापक व कला शाखेचे विद्यार्थी खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला.